धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
By श्रीकिशन काळे | Published: May 7, 2024 11:48 PM2024-05-07T23:48:01+5:302024-05-07T23:48:34+5:30
रात्री अकराच्या सुमारास घडला प्रकार, मतदान प्रक्रियेशी घटनेचा संबंध नसल्याची पोलिसांची माहिती
श्रीकिशन काळे, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: वारजे माळवाडी येथील रामनगर या ठिकाणी तीन अज्ञात व्यक्ती मंगळवारी (दि.७) रात्री अकराच्या सुमारास दुचाकीवर आले होते. त्यांनी हवेमध्ये गोळीबार केला. त्यानंतर ते तिथून निघून गेले. ज्या ठिकाणी गोळीबार झाला, ते ठिकाणी मतदान केंद्रापासून लांब होते. त्यामुळे मतदान प्रक्रियेचा यासंदर्भात काहीही संबंध नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
बारामती लोकसभेचे मतदान मंगळवारी (दि. ७) होते. रात्री उशीरापर्यंत मतदानाची प्रक्रिया होती. त्यामुळे वारजे माळवाडी या ठिकाणी अज्ञात व्यक्तींनी हवेत गोळीबार केला. त्याचा मतदानाची संबंध असल्याची चर्चा सुरू होती. परंतु, ज्या ठिकाणी गोळीबार केला, त्या ठिकाणापासून मतदान केंद्र बरेच लांब होते. त्यामुळे या गोळीबाराचा मतदान प्रक्रियेशी काहीही संबंध नसल्याचे दिसून आले. दुचाकीवर आलेल्या तिघांनी हवेत तीन फायरिंग केले. त्यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. हा गोळीबार झाला तेव्हा या परिसरातील मतदानाची प्रक्रिया झालेली होती, असेही सांगण्यात आले. त्यामुळे या गोळीबाराचा मतदान प्रक्रियेशी काहीही संबंध नसल्याचे बोलले जात आहे.