राष्ट्रवादीच्या आमदारावर पिंपरी चिंचवडला गोळीबार, आरोपी आरपीएफचा निवृत्त जवान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 08:30 AM2021-05-13T08:30:02+5:302021-05-13T08:31:41+5:30
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार बनसोडे यांच्या कार्यालयाबाहेर मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले आहे. यात दोन गोळ्या झाडल्याचा आवाज येत आहे.
पिंपरी (पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीतील आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर चिंचवड येथे बुधवारी दुपारी गोळीबार करण्यात आला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. तानाजी पवार असे संशयित आरोपीचे नाव आहे. तो आरपीएफचा निवृत्त जवान असून सध्या पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या एका कंत्राटदाराकडे नोकरीला आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार बनसोडे यांच्या कार्यालयाबाहेर मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले आहे. यात दोन गोळ्या झाडल्याचा आवाज येत आहे. सीसीटीव्ही फुटेज ब्लर असून घटना स्पष्टपणे कैद झालेली नाही. तत्पूर्वी या घटनेशी संबंधित एक घटना आकुर्डी येथे घडल्याचे निष्पन्न होत आहे. संबंधित कंत्राटदार कंपनीच्या काही जणांना अज्ञात व्यक्तींनी मारहाण केल्याचे समोर आले आहे. त्या प्रकरणी पोलिसांनी मारहाण झालेल्या व्यक्तींकडे विचारणा केली आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. आमदार बनसोडे यांच्या कार्यालय परिसरात पिस्तुलाच्या गोळीच्या दोन पुंगळ्या मिळून आल्या आहेत.
अरेरावीची भाषा
संबंधित कंत्राटदार यांच्याकडे दोन जणांना नोकरी मिळावी यासाठी कंत्राटदार याला फोन केला होता. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही म्हणून त्यांच्याकडील तानाजी पवार याला भेटायला बोलावले. त्यावेळी आरोपीने अरेरावीची भाषा वापरली म्हणून त्याला कार्यालयातून बाहेर नेण्यात आले. त्यावेळी त्याने माझ्यावर गोळीबार केला. मात्र यातून बचावलो असून, कोणालाही दुखापत झाली नाही, अशी माहिती आमदार अण्णा बनसोडे यांनी दिली.