औषध विक्रेत्याच्या पोटात झाडली गोळी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 12:40 PM2022-02-13T12:40:20+5:302022-02-13T12:47:36+5:30
माणगाव शहरात शुभम याचे औषधविक्रीचे दुकान आहे. शुक्रवार, दि. ११ फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे शुभम दुकान बंद करून मध्यरात्री घरी जाण्यास निघाला. त्यावेळी मोटरसायकलवरून दोन अनोळखी व्यक्ती आले. त्यांनी पत्ता विचारण्यासाठी त्याला थांबवले.
रायगड: माणगाव येथील औषध विक्रेत्यावर सिनेस्टाईलने मोटारसायकलवरून येऊन दोघांनी गोळीबार केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. शुभम जयस्वाल (वय २४) असे गोळीबार झालेल्या तरुणाचे नाव आहे. शुभमच्या पोटात गोळी लागली आहे. जखम गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी त्याला मुंबईला हलविले आहे. याबाबत माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. मात्र, हा हल्ला का झाला? याबाबत कारण अस्पष्ट आहे. या घटनेने माणगाव शहर हादरले आहे.
माणगाव शहरात शुभम याचे औषधविक्रीचे दुकान आहे. शुक्रवार, दि. ११ फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे शुभम दुकान बंद करून मध्यरात्री घरी जाण्यास निघाला. त्यावेळी मोटरसायकलवरून दोन अनोळखी व्यक्ती आले. त्यांनी पत्ता विचारण्यासाठी त्याला थांबवले. याचवेळी मागे बसलेल्याने शुभमच्या पोटावर पिस्तूल रोखून गोळी झाडली. यामध्ये शुभम गंभीर जखमी झाला. हा हल्ला माणगावमधील कचेरी रस्त्यावर झाला.
शुभमची प्रकृती स्थिर
मारेकरी गोळी झाडून पळून गेले. त्यांनी त्याच्याकडील ऐवज लुटण्याचा प्रयत्न केला नसल्याने वैयक्तिक हेवेदावे, पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला का? या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत. सध्या शुभमची प्रकृती स्थिर असल्याचे पोलीसनी सांगितले.