पेट्रोल पंपावरील दरोड्यात गोळीबार; तीन आरोपींना सक्तमजुरीची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 06:43 PM2021-02-11T18:43:49+5:302021-02-11T18:44:42+5:30
Latur Crime News : लातूर जिल्हा न्यायालयाचा निकाल : रक्कमेसह दागिनेही केले होते लंपास
लातूर : पेट्रोल पंपावर गोळीबार करुन दरोडा टाकल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.पी. रागीट यांनी तीन आरोपींना ७ वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी पाच हजार दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
सहायक सरकारी वकील विठ्ठल व्ही. देशपांडे यांनी सांगितले, गातेगाव ठाण्याच्या हद्दीतील हिरेमठ पेट्रोल पंपावर १६ जानेवारी २०१७ रोजी दरोडा पडला. सदर घटनेत मोटारसायकलवरून आलेल्या तिघांपैकी एकाने फिर्यादीच्या कानपट्टीला पिस्तुल लावले आणि कॅश दे असे फर्मावले व हवेत गोळी झाडली. दुसऱ्या आरोपीने कत्तीने बॅग कापून घेतली. इतक्यात पिस्तुल घेऊन आलेल्या आरोपीने पेट्रोल पंपाचे मालक हिरेमठ असलेल्या दिशेने दुसरी गोळी झाडली. तद्नंतर त्यांच्या जवळ जाऊन आणखी एक गोळी झाडली.
त्याने कपाटाची काच फुटली. त्याचवेळी अन्य आरोपीने हिरेमठ यांच्या हाताला कत्तीने मारले. यावेळी त्यांच्या गळ्यातील व हातातील दागिने हिसकावले. कॅश बॅगमधून ७० हजार रुपयेही चोरले. हा थरार सुरू असताना उपस्थितांनी व फिर्यादीने पळून जाणाऱ्या आरोपींवर दगडफेक केली. त्यावेळी आरोपीचे पिस्तुल पडले. त्यानंतर तिन्ही आरोपी मुरुडच्या दिशेने पळून गेले. या संदर्भात पोलिसांनी उपरोक्त तीन आरोपींसह तपासाअंती एका महिला पोेलीस कर्मचाऱ्याचाही गुन्ह्यात समावेश करुन दोषारोपपत्र दाखल केले. त्यात महिला पोलीस कर्मचा-याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली.
या प्रकरणात २४ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायाधीश डी.पी. रागीट यांनी आरोपी प्रभुलिंग महादेव लखादिवे, प्रदीप लिंबाजी ओगले, सचिन संभाजी कावळे या तिघांना कलम ३९४ तसेच कलम ७ सह कलम २५ (१-ए) शस्त्र अधिनियम अन्वये उपरोक्त शिक्षा फर्मावली. या खटल्यात सहायक सरकारी वकील विठ्ठल व्ही. देशपांडे यांना ॲड. वैशाली वीरकर-सूर्यवंशी, परमेश्वर तल्लेवाड यांनी सहाय्य केले. पोलीस निरीक्षक बी.आर.सोनटक्के, सहायक पोलीस निरीक्षक एस.ए. चव्हाण यांनी तपास केला. तर जीवन नारायण राजगीरवाड, पाेहेकॉ बक्कल नंबर ८१६ यांनी सहाय्य केल्याचे वकीलांनी सांगितले.