वेलट्रीट हॉस्पिटल प्रशासनाविरुद्ध पहिला गुन्हा दाखल, सदोष मनुष्यवधाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 01:10 AM2021-04-13T01:10:41+5:302021-04-13T01:11:09+5:30
well treat Hospital : ९ एप्रिलच्या रात्री वेलट्रीटला लागलेल्या भीषण आगीत महंत यांचे सासरे तुळशीराम सापकन पारधी (गोरेवाडा) यांच्यासह एकूण चारजण या अग्निकांडात ठार झाले होते.
- नरेश डोंगरे
नागपूर - भीषण अग्निकांडामुळे सर्वत्र चर्चेला आलेल्या वाडी येथील वेलट्रीट हॉस्पिटल प्रशासनाविरुद्ध वाडी पोलिसांनी सोमवारी रात्री सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. मृत व्यक्तीच्या जावयाने नोंदविलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला. यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रवीण रामदास महंत (वय ३७) हे या प्रकरणातील तक्रारदार आहेत. ९ एप्रिलच्या रात्री वेलट्रीटला लागलेल्या भीषण आगीत महंत यांचे सासरे तुळशीराम सापकन पारधी (गोरेवाडा) यांच्यासह एकूण चारजण या अग्निकांडात ठार झाले होते.
महंत यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या सासऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे वेलट्रीटमध्ये ५ एप्रिलला भरती करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना महंत यांचे रुग्णालयात येणे-जाणे होते. रुग्णालयाने सुमारे पावणेदोन लाख रुपये घेऊनही, पाहिजे तशी रुग्णाची व्यवस्था केली जात नव्हती. कोरोना रुग्णांसाठी दाटीवाटीने बेड लावण्यात आले होते आणि तेथे पाहिजे तशा सुविधाही नव्हत्या. दरम्यान, ९ एप्रिलला रात्री हॉस्पिटलला आग लागली आणि आगीत तुळशीराम पारधी, शिवशक्ती भगवान सोनबरसे, प्रकाश बापूरावजी बोळे आणि रंजना मधुकर कडू या चाैघांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच काहीजण श्वास गुदमरून, तर काही भाजून जखमी झाले.
या घटनेची प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस आपापल्या पातळीवर स्वतंत्रपणे चाैकशी करीत आहेत. वीज विभाग आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी या आगीचे कारण जाणून घेण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच पाहणी केली. त्यांचा अहवाल अद्याप उघड झाला नाही.
या पार्श्वभूमीवर, मृत पारधी यांचे जावई महंत यांनी सोमवारी सायंकाळी वाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. आगीला आणि सासऱ्याच्या मृत्यूला वेलट्रीट हॉस्पिटलचे डॉ. राहुल ठवरे आणि हॉस्पिटल प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला. त्यावरून वाडी पोलिसांनी रात्री डॉ. ठवरे तसेच प्रशासनातील मंडळींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचे कलम ३०४ भा.दं.वि. ३४ नुसार गुन्हा दाखल केला.
दुसराही गुन्हा दाखल होण्याचे संकेत
या प्रकरणात ही स्वतंत्र तक्रार असून, आगीचे कारण निश्चित झाल्यास आणि त्यात हॉस्पिटल प्रशासनाचा दोष अधोरेखित झाल्यास आणखी दुसरा गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे. यासंबंधाने वाडीच्या ठाणेदारांशी वारंवार संपर्क करूनही त्यांनी माहिती देण्याचे टाळले.
दोषींना शिक्षा व्हायला हवी
आर्थिक स्थिती चांगली नसताना हॉस्पिटल प्रशासन रुग्णांच्या नातेवाईकांकडून मोठी रक्कम घेते. मात्र, त्यांना पाहिजे तशा सुविधा उपलब्ध करून देत नाही. धोका टाळण्यासाठीही आवश्यक त्या उपाययोजना करीत नाहीत. रुग्णांच्या जीविताशी खेळणाऱ्या मंडळींना शिक्षा व्हायलाच पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया यानिमित्ताने तक्रारदार महंत यांनी ‘लोकमत’जवळ नोंदवली.