पहिलीच पोस्टिंग; यवतमाळहून बीडला आला अन् लाच घेताना जाळ्यात अडकला; एसीबीची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 10:04 PM2023-07-10T22:04:18+5:302023-07-10T22:04:40+5:30
प्रामाणिक काम करण्याऐवजी लाच घेतल्याने या लिपिकावर गुन्हा दाखल झाला.
बीड : सहा वर्षांपूर्वी लिपिक सह जिल्हा निबंधक कार्यालयात लिपिक म्हणून नोकरी लागली. नव्या जोमाने काम करण्याऐवजी लाच घेण्याची सवय झाली. यातच एका व्यक्तीने बीडच्या एसीबीकडे धाव घेत तक्रार केली. त्यानंतर अवघ्या तीन तासांतच एसीबीने सापळा रचून या लिपिकाला दीड हजार रुपयांची लाच घेताना बेड्या ठोकल्या. ही कारवाई सोमवारी दुपारी ५ वाजेच्या सुमारास केली. नोकरीसाठी यवतमाळहून बीडला आला. पहिलीच पोस्टिंग होती. प्रामाणिक काम करण्याऐवजी लाच घेतल्याने या लिपिकावर गुन्हा दाखल झाला.
विनोद गिरीधर मुनेश्वर (वय ३२, रा. जराठी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ ह.मु. बीड) असे पकडलेल्या लिपिकाचे नाव आहे. तक्रारदार यांचे आईचे नावावरील जमीन नावावर करण्याबाबत गेवराई न्यायालयाने आदेश दिलेले आहे. त्याकरिता सह जिल्हा निबंधक कार्यालयात मुद्रांक शुल्क भरून पावती व हुकूमनामा प्रमाणित करून देण्यासाठी मुनेश्वरने १५०० रुपयांची लाच मागितली. नियमाप्रमोण केवळ ६०० रुपये लागत असतानाही जास्तीचे पैसे मागितल्याने तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. येथे पोलिस निरीक्षक अमोल धस यांनी सर्व माहिती घेत लगेच ५ वाजता सापळा लावला. मुनेश्वर याने आपल्या टेबलवर बसूनच ही लाच स्वीकारली. धस यांच्यासह टीमने त्याला पकडले. त्याच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार होता. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अमोल धस, भरत गारदे, हनुमान गोरे, अविनाश गवळी, संतोष राठोड, चालक गणेश म्हेत्रे यांनी केली.
कारवाईआधी घेतले सहा हजार रुपये -
१५०० रुपयांची लाच घेण्याअगोदर याच मुनेश्वरने एका व्यक्तीकडे सहा हजार रुपयांची लाच घेतली होती, अशी चर्चा कार्यालयात होती. या कार्यालयात भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी अनेकदा प्राप्त झाल्या होत्या. परंतु पुरावा मिळत नव्हता. तसेच चौकशीही गुलदस्त्यात राहिल्याचे सूत्रांनी सांगितले. परंतु मुनेश्वरवरील कारवाईने या कार्यालयात लाच घेतली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.