आधी फेसबुकवरून प्रेम असल्याचं भासवायची, मग लाखोंचा ऐवज लांबवायची; महिलेसह साथीदाराला अटक

By प्रशांत माने | Published: January 2, 2023 05:52 PM2023-01-02T17:52:19+5:302023-01-02T17:57:09+5:30

तीने १०  ते १२ जणांना फेसबुकवर प्रेमाचा बहाणा करीत लुबाडल्याचे तपासात समोर आले आहे.

First pretending to be in love on Facebook, then delaying the exchange of lakhs; Woman along with accomplice arrested | आधी फेसबुकवरून प्रेम असल्याचं भासवायची, मग लाखोंचा ऐवज लांबवायची; महिलेसह साथीदाराला अटक

आधी फेसबुकवरून प्रेम असल्याचं भासवायची, मग लाखोंचा ऐवज लांबवायची; महिलेसह साथीदाराला अटक

googlenewsNext

डोंबिवली - फेसबुकवर एका अनोळखी महिलेशी मैत्री करणे काहींना चांगलेच महागात पडले आहे. नाव बदलून फेसबुकवर चॅटींगच्या माध्यमातून ती महिला प्रेमाच्या जाळ्यात ओढायची आणि भेटायला बोलावून त्यांच्याकडील लाखोंचा ऐवज लांबवायची. अशाप्रकारे लुबाडल्या गेलेल्या एका व्यावसायिकाने पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी कसोशिने तपास करून त्या भामट्या महिलेसह तीच्या साथीदाराला गोव्यातून अटक केली आहे.  तीने १०  ते १२ जणांना फेसबुकवर प्रेमाचा बहाणा करीत लुबाडल्याचे तपासात समोर आले आहे. समृध्दी खडपकर आणि तीचा साथीदार विलेंडर विल्फड डिकोस्टा या अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी सुमारे २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

डोंबिवली ग्रामीण भागातील एका केबल व्यावसायिकाला फेसबुकवर संस्कृती खेरमनकर नावाने फ्रेंड रिकवेस्ट आली. ती अॅक्स्पेट केल्यानंतर त्या दोघांमध्ये मेसेज आणि कॉल ही झाले. २१ डिसेंबरला व्यावसायिकाने महिलेला बदलापूर पाईपलाईन रोडवर खोणी येथील एका हॉटेलवर रूममध्ये जेवण करण्यासाठी बोलावले होते. रात्री ११.३० वाजता लघुशंका आल्याने व्यावसायिक वॉशरूमला गेला असता महिलेने त्याचा मोबाईल, सोन्याच्या तीन चेन, हातातील सोन्याचे कडे, एक टायटन घडयाळ आणि त्याचे परवानाधारक रिव्हॉल्वर असा ४ लाख ७५ हजाराचा मुद्देमाल चोरून पोबारा केला. चोरलेल्या रिव्हॉल्वरचा महिलेकडून गैरवापर होण्याची दाट शक्यता होती. या घटनेचे गांभिर्य ओळखून पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे आणि मानपाडा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक अविनाश वनवे, सुनिल तारमळे, पोलिस हवालदार सुशांत तांबे, सुनिल पवार, राजेंद्र खिलारे, दिपक गडगे, विकास माळी, पोलिस नाईक शांताराम कसबे, यलप्पा पाटील, देवा पवार, प्रविण किनरे, पोलिस शिपाई बालाजी गरुड, महिला पोलिस हवालदार अरुणा चव्हाण, महिला पोलिस नाईक प्राजक्ता खैरनार यांचे पथक नेमले गेले होते. 

तपासात तीने फेसबुकवर बोगस नाव टाकल्याचे उघड झाले. तीचे नाव समृध्दी खडपकर असे असून ती खारमध्ये राहते आणि तीच्याविरोधात डोंबिवली लोहमार्ग आणि ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहीती प्राप्त झाली. तीच्या पत्त्यावर जाऊन चौकशी केली असता ती गोव्याला गेल्याचे समजले. तीला गोवा, बारदेज जिल्ह्यातील पेड म्हापसा येथून २८ डिसेंबरला अटक करण्यात पथकाला यश आले. तत्पुर्वी २६  डिसेंबरला तीचा साथीदार विलेंडरला ताब्यात घेण्यात आले.

चोरलेल्या वस्तूंची स्वस्तात विक्री -
सोन्याचे दागिने, मोबाईल, फोन अशा वस्तू चोरी करून समृध्दी पळून जायची. बदनामीच्या भितीने लोक तक्रार करीत नसल्याचे पाहून तीचे मनोबल वाढले होते. तीने अशा पध्दतीने १० ते १२ जणांना गंडा घातला होता. गोव्यात राहणारा तीचा सहकारी विलेंडर तीने चोरलेल्या वस्तू बाजारात स्वस्तात विकायचा.

२०  लाख ८१  हजाराचा मुद्देमाल जप्त -
दोघा आरोपींकडून १६ मोबाईल फोन, १ रिव्हॉल्वर, सहा जिवंत काडतुसे, दोन घडयाळे, २९० ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण २० लाख ८१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विमानातून प्रवास -
एखाद्याला जाळ्यात ओढून त्याच्याकडील ऐवज चोरल्यावर ती थेट  गोव्यात जायची. त्यावेळी ती लीना खडपकर या नावाने विमानाने प्रवास करायची अशीही माहिती तपासात उघड झाली आहे.
 

Web Title: First pretending to be in love on Facebook, then delaying the exchange of lakhs; Woman along with accomplice arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.