आधी पत्नीला ठार मारले, मग पतीने उचलले टोकाचे पाऊल
By दिपक ढोले | Published: May 12, 2023 09:53 PM2023-05-12T21:53:22+5:302023-05-12T21:54:20+5:30
पती संजय हा मनोरूग्ण असल्याची पोलिसांची माहिती
दीपक ढोले, जालना: कौटुंबिक वादातून रागाच्या भरात पतीने पत्नीला घरात कोंडून रॉडने मारहाण करून खून केला. नंतर स्वत: शेतात जाऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंठा तालुक्यातील दहिफळ खंदारे येथे शुक्रवारी घडली. संगीता संजय पवार वय (३२), संजय अंकुश पवार (३५) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास संजय पवार हा पत्नी संगीता हिला कौटुंबिक वादातून घर आतून बंद करून मारहाण करत होता. तेव्हा त्यांची तीन मुले घराबाहेर खेळत होती. पत्नीला मारहाण सुरू असताना शेजारी राहणाऱ्या या नातेवाईकांनी दार उघडण्याचा व संजय याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, संजय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. रागाच्या भरात त्याने घरातील लोखंडी रॉड संगीता हिच्या डोक्यात मारला. त्यामुळे ती जागीच गतप्राण झाली. पत्नी मरण पावल्याचे लक्षात येताच संजय घरातून बाहेर पडला. त्याने शेतात जाऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मंठा ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता मंठा ग्रामीण रुग्णालयात हलविले. परतूरचे उपविभागीय पाेलिस अधिकारी राजू मोरे यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याप्रकरणी मंठा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, संजय हा मनोरूग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले.