अगोदर लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार, मग सोशल माध्यमांवर बदनामी
By योगेश पांडे | Published: April 9, 2023 04:42 PM2023-04-09T16:42:46+5:302023-04-09T16:43:16+5:30
निर्वाणीचे विचारले असता त्याने लग्नास नकार दिला. तसेच तिच्या इन्स्टाग्रामवर अश्लिल मजकूर तसेच घाणेरडे फोटो टाकून तिची बदनामी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अगोदर लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने एका महिलेची सोशल माध्यमांवर फोटो टाकून बदनामी केली. पोलिसांनी या प्रकरणात मोहम्मद इर्शाद फारूक अन्सारी (२३, हिवरी नगर, नंदनवन) या आरोपीला अटक केली आहे. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
संबंधित ३० वर्षीय महिलेची आरोपीसोबत मैत्री झाली. त्याने तिच्या प्रेम असल्याची बतावणी केली व लग्न करण्यासाठी प्रपोज केले. ७ ऑगस्ट २०२१ रोजी त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवत मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर त्याने अनेकदा असा प्रकार केला.
महिलेने त्याला लग्नाबाबत विचारणा केली असता तो नेहमी टाळाटाळ करायचा. अखेर चिडून जाऊन महिलेने त्याचा निर्वाणीचे विचारले असता त्याने लग्नास नकार दिला. तसेच तिच्या इन्स्टाग्रामवर अश्लिल मजकूर तसेच घाणेरडे फोटो टाकून तिची बदनामी केली. हा प्रकार लक्षात आल्यावर महिलेला मोठा धक्का बसला. तिने मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक केली.