पर्यटन मौसमच्या पहिल्या आठवडय़ातच गोव्यात 23.67 लाखांचे ड्रग्स जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 08:52 PM2018-10-08T20:52:38+5:302018-10-08T20:52:56+5:30
किनारपट्टी भागात ड्रग विक्रेते सक्रीय, आतापर्यंत दोन विदेशी नागरिकांसह 9 जणांना अटक
सुशांत कुंकळयेकर
मडगाव - गोव्यात पर्यटन मौसम सुरु होऊन एक आठवडा देखील उलटला नसताना अमली पदार्थ पकडण्याची तब्बल 9 प्रकरण उघडकीस आली असून या पहिल्या आठवडय़ातच एकूण 23.67 लाखांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. अमली पदार्थविरोधी मोहीम राबवून एएनसी विभागाने गोव्यातील किनारपट्टीवर सध्या लक्ष केंद्रीत केले आहे.
गोव्यात 4 ऑक्टोबरपासून पर्यटन मौसम सुरु झाला. मात्र, 3 ऑक्टोबरपासून अमली पदार्थ पकडण्याची मोहीम सुरु झाली आहे. आतापर्यंत 9 व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यात दोन विदेशी नागरीक, सहा गोवाबाहेरुन आलेले पण गोव्यात स्थायिक झालेले तर एका गोमंतकीय तरुणाचा समावेश आहे. समुद्र किनारे ते दाबोळीचा विमानतळ या सर्व पट्टय़ात हा व्यवसायाचे मोठे जाळे पसरल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
तीन दिवसांपूर्वी दाबोळी विमानतळावर मस्कतला जाण्यासाठी विमानात चढण्यासाठी आलेल्या अल फराह (वय २५) युवकाला पकडण्यात आले होते. त्याच्या सामानाची तपासणी केली असता त्या सामानात लपविलेला 8 लाखांचा चरस पोलिसांना सापडला होता. या अमली पदार्थाचे वजन दोन किलो होते. हा अमली पदार्थ नेमका कुठे जात होता याचा तपास सध्या चालू आहे. 5 ऑक्टोबरला अंजुणा येथे स्थानिक पोलिसांनी संशयावरुन ओबे सानी या नायजेरियन युवकाला अटक केली असता त्याच्याकडेही 35 हजार रुपयांचा चरस सापडला होता.
अमली पदार्थ विभागाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणो, उत्तर गोव्यातील किनारपट्टी भागात हा व्यवसाय अधिक फोफावला असून 4 ऑक्टोबरला वागातोर येथे एएनसीने घातलेल्या धाडीत हिमाचल प्रदेशच्या लालदास याच्याकडे 5.50 लाखांचा चरस सापडला होता. त्याच दिवशी कळंगूट पोलिसांनी प्रणव पटेल या 22 वर्षीय गुजराती युवकाला अटक केली असता त्याच्याकडे 1.30 लाखांचा चरस सापडले होते. दुसऱ्या दिवशी 5 ऑक्टोबर रोजी उत्तर गोव्यातील हरमल किनाऱ्यावर एएनसीने धाड घातली असता कुलू हिमाचल प्रदेश येथील मोहनलाल याच्याकडे 5.65 लाखांचा चरस सापडला होता. याशिवाय 6 ऑक्टोबरला हरमल येथे महंमद जोहेब खान याला अटक केली असता त्याच्याकडे 20 हजाराचा चरस सापडला होता. विमानतळाप्रमाणोच रेल्वे स्थानकावरही अमली पदार्थ पोचले असून दोन दिवसांपूर्वी कोंकण रेल्वे पोलिसांनी मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर संशयावरुन सतीश रेड्डी या मूळ तमिळनाडूच्या पण सध्या वास्को येथे रहाणाऱ्या युवकाला अटक केली असता त्याच्याकडे 45 हजाराचा गांजा सापडला. 3 ऑक्टोबरला मायणा-कुडतरी पोलिसांनी रामनगरी येथे घातलेल्या धाडीत जफर शेख या दवर्लीच्या युवकाकडे चार हजारांचा गांजा सापडला होता. तर 6 ऑक्टोबर रोजी फोंडा पोलिसांनी शिरोडा येथे संशयावरुन साईश नाईक या 22 वर्षीय मडकईच्या स्थानिक युवकाला अटक केली असता त्याच्याकडे 85 हजाराचा गांजा सापडला होता.
एएनसीचे पोलीस अधीक्षक उमेश गावकर यांच्याशी संपर्क साधला असता पर्यटन मौसम सुरु झाल्यानंतर किनारपट्टी भागात अमली पदार्थाची विक्री सुरु होते याची माहिती पोलिसांना असल्याने किनारपट्टीवरील गस्त अधिक कडक केल्याचे त्यांनी सांगितले. गोव्यात गांजा पकडण्याचे प्रमाण वाढण्यामागचे कारण स्पष्ट करताना बहुतेक कामगार वर्गामध्ये गांजा ओढण्याचे प्रमाण अधिक असल्याने ज्या ठिकाणी कामगार वर्ग अधिक आहे. त्या भागात असे प्रकार सापडले आहेत असे त्यांनी सांगितले. एएनसीबरोबरच इतर ठिकाणच्या पोलिसांनाही सतर्क करण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.