सर्च ऑपरेशनच्या चार तासांच्या थरारात पाच आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 11:04 AM2021-06-02T11:04:04+5:302021-06-02T11:04:20+5:30
Five accused arrested in four hours of search operation : अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरिक्षकांसह ८४ अधिकारी कर्मचारी दधम-जयराम गड शिवारात सैरावैरा धावले.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: अंत्रज येथील कोंबींग ऑपरेशननंतर सोमवारी पोलिसांनी दुसरे स्पॉट सर्च ऑपरेशन यशस्वी केले. वैशाखाच्या उकाड्यात...अंगाची काहिली करणाऱ्या उन्हात सहा किलोमीटर परिसराचा माळरान पोलिसांनी धावत पालथा घातला. अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरिक्षकांसह ८४ अधिकारी कर्मचारी दधम-जयराम गड शिवारात सैरावैरा धावले. सराईत गुन्हेगारांच्या दगडफेकीला न जुमानता पोलिसांनी जीवावर उदार होत पाच गुन्हेगारांना चार तासांच्या थरारानंतर पकडलेच.
खोदकामात सापडलेली सोन्याची नाणी...मांडूळ साप...कमी किमतीत महागडी गाडी अशा प्रकारचे आमिष दाखवून लुटणाऱ्या दुसऱ्या एका टोळीचा खामगाव पोलिसांनी पर्दाफाश केला. अटक करण्यात आलेल्या सर्वच आरोपींवर राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. एकावर कर्नाटक आणि इतर राज्यातही गुन्हे दाखल आहेत. अंत्रज, हिवरखेड, रोहणा, कंझारा येथील सराईत गुन्हेगार आणि एकाच पद्धतीने फसवणूक करण्याचा पॅटर्न असलेल्या तीन टोळक्यांचे मुसके आवळल्यानंतर आता खामगाव तालुक्यातील जयरामगड, दधम, प्रिंपी धनगर परिसरात वास्तव्य आणि लुटमारी करण्याचे प्राबल्य असलेल्या दुसऱ्या टोळीच्याही नांग्या ठेचल्या.
वैशाख वणव्यात डोंगरात चार तासांचा थरार!
अंगाची काहिली करणारे उन्ह...पाणी पाणी करणारा जीव घेऊन खामगाव उपविभागीय पोलिसांच्या १४ अधिकाऱ्यांसह ६८ कर्मचाऱ्यांचे पथक या सराईत गुन्हेगारांचा पाठलाग करीत होते. कधी पोलीस पुढे तर कधी गुन्हेगार पुढे अशा प्रकारच्या थरार नाट्यात अखेर पोलिसांची जीत झाली. सराईत गुन्हेगार स्वत:च्या बचावार्थ डोंगराळ माळरान आणि रानावनात सैरावैरा धावत होते. कधी पोलिसांवर दगडफेक करीत होते. तर कधी शस्त्रांचा धाक दाखवित पोलीस कारवाई टाळण्याचा प्रयत्न करीत होते; मात्र पोलिसांनी शेवटच्या क्षणापर्यंत गुन्हेगारांचा पाठलाग करून आरोपींना जेरीस आणले.
खामगाव आणि परिसरात नकली नाणी आणि विविध माध्यमांद्वारे फसवणूक करणे. लुटमार करून दहशत निर्माण करणे अशा सराईत गुन्हेगारांच्या टोळीतील पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या सांघिक प्रयत्नांना चार तासांच्या थरारानंतर यश आले.
- हेमराजसिंह राजपूत
अपर पोलीस अधीक्षक, खामगाव.