विद्युततारा चोरी प्रकरणी पाच आरोपी ताब्यात, ९.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त; एलसीबीची कारवाई
By संतोष वानखडे | Published: March 10, 2024 05:44 PM2024-03-10T17:44:12+5:302024-03-10T17:44:40+5:30
सर्व आरोपी अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील असल्याची माहिती
संतोष वानखडे, वाशिम : पाच लाख रुपये किंमतीच्या ॲल्युमिनीअमच्या विद्युत तारा चोरी प्रकरणाचा छडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लावला असून, याप्रकरणी ९.२८ लाखांचा मुद्दमाल जप्त केल्याची माहिती १० मार्च रोजी देण्यात आली.
१३२ केव्ही विद्युत उपकेंद्र मंगरूळपीर ते अंबापूर फाट्यापर्यंत अंदाजे पाच लाख रुपये किंमतीच्या ॲल्युमिनिअमच्या विद्युत तारा अज्ञात चोरट्याने १६ जानेवारी २०२४ ला चोरून नेल्याची फिर्याद महावितरणचे कनिष्ठ अभियंता सुरज कोंगे यांनी मंगरूळपीर पोलिस स्टेशनला दिली होती.
याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूद्ध भादंवी कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला होता. या घटनेचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खबऱ्याकडून आरोपींची नावे मिळाली. शेख अंसार शेख शेख चाँद उर्फ बब्बू (वय ३६) रा. अमडापूर (ता. चिखली, जि. बुलढाणा), शेख शहजाद शेख कदीर (वय २३) रा. समी प्लॉट, पातूर( जि. अकोला), शेख अकबर शेख अबू कलाम (वय ३५) रा. काळेगाव, (ता. खामगाव, जि. बुलढाणा), शेख मोहसीन शेख करीम (वय ३६) रा. मोमीनपुरा, पातूर ( जि. अकोला) व शेख शोएब शेख खलील (वय २१) रा. मोमीनपुरा, पातूर ( जि. अकोला) या पाच आरोपींना बुलढाणा व अकोला जिल्हयातून ताब्यात घेउन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.
नाल्याखाली लपविल्या विद्युत तारा
चोरीस गेलेल्या विद्युत तारा या पातूर येथील एका नाल्याच्या खाली लपवून ठेवल्या असल्याचे आरोपींनी तपासादरम्यान पोलिसांना सांगितले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमूद ठिकाणी जाउन एकूण ४५६ किलो अॅल्युमिनीअमच्या विद्युत तारा, (किंमत अंदाजे २,२८,०००) व आरोपीतांनी चोरी करताना वापरलेले एमएच ४८ जी १२७१ क्रमांकाचे बोलेरो पीकअप वाहन (किंमत सात लाख) असा एकूण ९ लाख २८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.