आयपीएल सामन्यावर बेटिंग घेणाऱ्यांना पाच जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2020 03:38 AM2020-11-01T03:38:29+5:302020-11-01T03:38:49+5:30
Crime News : लोट्सबुक२४७ या वेबसाइटचा वापर करून बेटिंग घेत होते. त्यांच्याकडून १३ मोबाइल फोन, लॅपटॉप, टीव्ही रायटर व १ लाख ३४ हजारांची रोकड जप्त केली.
मुंबई : आबुधाबी येथे सुरू असलेल्या आयपीएलमधील क्रिकेट सामन्यावर सट्टा घेत असलेल्या घाटकोपर पूर्व येथील एका हुक्का पार्लरवर मुंबई गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा टाकला. बुकीसह पाच जणांना अटक केली.
लोट्सबुक२४७ या वेबसाइटचा वापर करून बेटिंग घेत होते. त्यांच्याकडून १३ मोबाइल फोन, लॅपटॉप, टीव्ही रायटर व १ लाख ३४ हजारांची रोकड जप्त केली. घाटकोपर पूर्व येथील किक कॅफे या हुक्का पार्लर येथे आबुधाबी येथे शुक्रवारी रात्री सुरू असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब व राजस्थान रॉयल या संघातील सामन्यावर बेटिंग घेण्यात येत असल्याची माहिती गुन्हा अन्वेषण शाखेच्या कक्ष ५ चे प्रभारी जगदीश साईल यांना मिळाली. वरिष्ठांच्या सूचनेनुसार त्यांनी निरीक्षक योगेश चव्हाण, सहायक निरीक्षक गणेश जाधव, महेंद्र पाटील आदींच्या पथकासह त्या ठिकाणी छापा टाकला.
तेथे मोबाइलवर ‘लगाई खाई’ या ॲपवर बेटिंग घेण्यात येत होते, त्यासाठी वापरलेले मोबाइलचे सिम कार्ड हे बनावट कागदपत्रे सादर करून मिळविले असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. अटक केलेले पाचही जण पोलीस कोठडीत आहेत.