चाेरीच्या दुचाकींचे स्पेअर पार्ट विकणाऱ्या टाेळीतील पाच जण अटकेत, चोरलेल्या वाहनांची अशी लावायचे विल्हेवाट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 09:35 PM2021-11-21T21:35:16+5:302021-11-21T21:35:54+5:30
Crime News: विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दीतून पळविलेल्या माेटारसायकलींचे सुट्टे पार्ट काढून इतरांना विक्री करणाऱ्या मेकॅनिक टाेळीचा लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सायंकाळी पर्दाफाश केला.
लातूर - विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दीतून पळविलेल्या माेटारसायकलींचे सुट्टे पार्ट काढून इतरांना विक्री करणाऱ्या मेकॅनिक टाेळीचा लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सायंकाळी पर्दाफाश केला. याप्रकरणी चार मेकॅनिक आणि एका माेटारसायकल चाेरट्याला अटक केली. याबाबत देवणी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून घरफाेडी, माेटारसायकल चाेरीतील गुन्हेगारांचा शाेध घेतला जात हाेता. माेहिमेवर असलेल्या पथकाला खबऱ्याने माहिती दिली. वलांडी (ता. देवणी) येथे एका गॅरेजमध्ये चाेरीतील माेटारसायकलींच्या सुट्या पार्टची विक्री, परस्पर विल्हेवाट लावली जाते. या माहितीच्या आधारे पथकाने वलांडीत रविवारी गॅरेजवर छापा मारला. गॅरेजमधील सुटे स्पेअर पार्ट जप्त केले. यावेळी सिराज चाॅदपाशा बावडीवाले (२५ रा. वलांडी ता. देवणी), संगमेश्वर तुकामराम पुंडे (२५ रा. मानकेश्वर ता. भालकी जि. बीदर), कृष्णा पुंडलिक कांबळे (२४ रा. बेंबळी ता. देवणी) आणि नानासाहेब विश्वनाथ गायकवाड (२७ रा. चवणहिप्परगा ता. देवणी) या चाैघा मेकॅनिकला ताब्यात घेतले. दशरथ यादव सूर्यवंशी (रा. हेळंब ता. देवणी) हा चाेरीच्या माेटारसायकली घेवून येताे. आम्हाला फाेन करुन हेळंब येथे बाेलावून घेत त्या माेटारसायकलींचे स्पेअर पार्ट वेगळे करायला सांगताे. हे स्पेअर पार्ट आम्ही दुसऱ्या जुन्या माेटारसायकलधारकांना गरजेप्रमाणे विक्री करताे, अशी माहिती दिली. यानंतर दशरथ सूर्यवंशी याला हेळंब गावातून अटक केली. पथकाने तीन माेटारसायकली, स्पेअर पार्ट, चिसी असा एकूण १ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सपाेनि. बहुरे, बिलापट्टे, मस्के, देवकत्ते, शेख, पाटील, कांबळे, अंगद काेतवाड यांच्या पथकाने केली.
तब्बल २०० चोरीच्या वाहनांची लावली विल्हेवाट
चाेरीच्या माेटारसायकलींचे स्पेअर पार्ट काढून घेतल्यानंतर त्यांच्या चिसी (सांगाडा) विहरीत टाकल्या जात असत. शिवाय, मांजरा नदीला आलेल्या पुरातही चिसी टाकण्यात आल्याची माहिती मिळाली. ताब्यातील पाच जणांच्या माहितीवरुन एका विहिरीत शाेध घेतला असता, माेटारसायकलींचे सांगाडेच हाती लागले. चिसी क्रमांकावरुन माेटारसायकलीचा शाेध लागेल, यासाठी ही खबरदारी घेतल्याचे समाेर आले. जवळपास २०० वाहनांची विल्हेवाट लावल्याचा अंदाज पाेलिसांनी वर्तविला आहे.