रेरा फसवणूकप्रकरणी पाच बिल्डरांना अटक, एसआयटीने केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 02:47 PM2022-11-24T14:47:20+5:302022-11-24T14:49:05+5:30
महापालिकेच्या नगररचना विभागाकडून वैधरीत्या बांधकाम परवानगी मिळालेली नसताना, खोट्या सही-शिक्क्याचा वापर करून ६५ प्रकरणांत बांधकाम परवानगी मिळविल्याचे भासवून ‘रेरा’कडून बांधकाम नोंदणी प्रमाणपत्र मिळविण्यात आले.
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका आणि महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (महारेरा) यांची फसवणूक केल्याप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) पाच बिल्डरांना बुधवारी अटक केली आहे. मुकुंद मिलिंद दातार, सुनील बाळाराम मढवी, आशू लक्ष्मण मुंगेश, रजत राजन आणि राजेश रघुनाथ पाटील अशी या बिल्डरांची नावे आहेत.
महापालिकेच्या नगररचना विभागाकडून वैधरीत्या बांधकाम परवानगी मिळालेली नसताना, खोट्या सही-शिक्क्याचा वापर करून ६५ प्रकरणांत बांधकाम परवानगी मिळविल्याचे भासवून ‘रेरा’कडून बांधकाम नोंदणी प्रमाणपत्र मिळविण्यात आले. माहिती अधिकारात वास्तूविशारद संदीप पाटील यांनी हे प्रकरण उघडकीस आणले. त्यानंतर त्यांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली. तसेच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या प्रकरणात महापालिकेच्या तक्रारीवरून डोंबिवलीतील रामनगर आणि मानपाडा पोलिसांत ६५ बिल्डरांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाची एसआयटी व इडीकडूनही चौकशी सुरू आहे.
दरम्यान, पाटील यांच्या जीवास धोका असल्याने त्यांनी पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी केली होती. मात्र, त्यांना अद्याप ते मिळालेले नाही. त्यामुळे त्यांनी कल्याण न्यायालयात आपला जबाब नोंदविला आहे. त्यानंतर बुधवारी एसआयटीने पाचजणांना अटक केली आहे.
खोटी कागदपत्रे बनवणाऱ्यांना झाली होती अटक
- या प्रकरणात खाेटी कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी प्रियंका रावराणे, प्रवीण ताम्हणकर, राहुल नवसागरे, जयदीप त्रिभुवन आणि कैलास गावडे या पाच जणांना
५ नाेव्हेंबरला अटक केली हाेती.
- दाेन दिवसांच्या पाेलीस काेठडीनंतर न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन काेठडीत केली हाेती.
- या पाच जणांकडून आठ
संगणक जप्त केले. पाच जणांशी संबंधित १६ बँक खाती गाेठविण्यात आली.
- यापूर्वी बिल्डरांची ४० बँक खाती गाेठविली हाेती.