मुंबईहून निघालेल्या कारमधील पाच कोटी लुटले, सातारा जिल्ह्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 11:22 PM2024-10-15T23:22:23+5:302024-10-15T23:24:05+5:30

पिस्तुल व धारदार शस्त्रांचा धाक दाखवून लूटले पैसे. मुंबईहून दक्षिण भारतात नेली जात होती रोकड; पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले. 

Five crore rupees were looted from a car leaving Mumbai near Karhad in Satara district | मुंबईहून निघालेल्या कारमधील पाच कोटी लुटले, सातारा जिल्ह्यातील घटना

मुंबईहून निघालेल्या कारमधील पाच कोटी लुटले, सातारा जिल्ह्यातील घटना

कऱ्हाड : मुंबईहून हवाला मार्गे दक्षिण भारतात कारमधून नेली जाणारी पाच कोटी रुपये लुटण्यात आले. पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर कऱ्हाडनजीक ढेबेवाडीफाटा येथे कारला वाहन आडवे लावून पिस्तुल व धारदार शस्त्राचा धाक दाखवित पाचजणांनी ही लुट केली. मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून, मुख्य सुत्रधाराचा शोध सुरू केल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत हवाल्याने पैसे पोहोचविणारी एक कंपनी आहे. या कंपनीचे मोठे कार्यक्षेत्र दक्षिण भारतातील मोठ्या शहरांमध्ये आहे. सोमवारी रात्री मुंबईतील कार्यालयातून या कंपनीचे पाच कोटी रुपये दक्षिण भारतातील एका शहरात पोहोचविले जाणार होते.

ही रोकड एका कारमधून नेली जाणार होती. सोमवारी रात्री मुंबईहून संबंधित कार दक्षिण भारताकडे जाण्यासाठी निघाली. मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कार कऱ्हाडमध्ये आली असता ढेबेवाडी फाट्यानजीक अचानक एक चारचाकी वाहन कारच्या आडवे आले. 

त्यामुळे चालकाने कार थांबवली. कार थांबताच संबंधित वाहनातून चार-पाचजण खाली उतरले. त्यांच्या हातात पिस्तुल तसेच धारदार शस्त्रे होती. त्यांनी कारमधील लोकांना शस्त्रांचा तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून पाच कोटी रुपये लंपास केले. त्यानंतर लुटमार करणारे साताऱ्याच्या दिशेने पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तातडीने त्याठिकाणी दाखल झाले. पहाटेपासून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत. त्यातून महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून चार संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, मुख्य सुत्रधार अद्याप हाती लागला नसल्याचे पोलिसांनी सांगीतले. गुरूवारपर्यंत लुटलेली रोकड व मुख्य सुत्रधार अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Web Title: Five crore rupees were looted from a car leaving Mumbai near Karhad in Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.