रस्त्यावर उभी होती संशयास्पद कार; पोलिसांनी दार उघडताच आढळले 5 मृतदेह...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 02:54 PM2024-09-26T14:54:42+5:302024-09-26T14:56:46+5:30
घरापासून 200 किलोमीटर दूर पाच मृतदेह आढळल्यामुळे पोलिसही चक्रावले आहेत.
चेन्नई: तामिळनाडूतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील राष्ट्रीय महामार्गावर रात्रभर एक कार उभी होती. दुसऱ्या दिवशी स्थानिक नागरिकांनी पोलिसांना या संशयास्पद कारची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कारचा दरवाजा उघडताच त्यांना जबर धक्का बसला. पोलिसांना कारमध्ये पाच जणांचे मृतदेह आढळले. पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत.
घरापासून 200 किमी अंतरावर मृतदेह सापडले
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना तामिळनाडूतील पुदुक्कोट्टई जिल्ह्यातील आहे. मृतांमध्ये तीन महिलांचाही समावेश आहे. हे सर्व एकाच कुटुंबातील होते. बुधवारी(दि.26) सकाळी त्रिची-कराईकुडी राष्ट्रीय महामार्गावर नमनसमुद्रनजवळ कार पार्क केलेली स्थानिकांना आढळली. सर्वांनी विष प्राशन केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. हे कुटुंब तामिळनाडूतील सेलमचे रहिवासी होते. घरापासून सुमारे 200 किमी अंतरावर सर्वांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.
कर्जामुळे आत्महत्या केल्याचा अंदाज
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेटल व्यापारी मणिकंदन, त्यांची पत्नी नित्या, आई सरोजा आणि दोन मुलांचा मृतांमध्ये समावेश आहे. मणिकंदन यांच्यावर मोठे कर्ज असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांना कारमध्ये एक पत्रही सापडले. मात्र, या घटनेमागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.