टोळक्याने केलेल्या हल्ल्यात पाच जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 12:55 AM2019-02-05T00:55:09+5:302019-02-05T00:56:22+5:30
पवनानगर येथील ठाकूरसाई गावात किरकोळ कारणावरून टोळक्याने एका घरावर केलेल्या हल्ल्यात पाच जण जखमी झाले आहेत, तर दगडफेक केल्याने घराचे पत्रेदेखील फुटल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोणावळा - पवनानगर येथील ठाकूरसाई गावात किरकोळ कारणावरून टोळक्याने एका घरावर केलेल्या हल्ल्यात पाच जण जखमी झाले आहेत, तर दगडफेक केल्याने घराचे पत्रेदेखील फुटल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी रात्री हा प्रकार घडला.
पवनानगर येथील पत्रकार रवी ठाकर हे रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांच्या भावाच्या आल्टो गाडीतून मुलांसह शेतावरील घरी जात असताना गेव्हंडे गावाकडील अरुंद रस्त्यावर समोरून एक मोटार आली. दोन्ही गाड्या एकाच वेळी जाणे शक्य नसल्याने व ठाकर यांच्या गाडीच्या मागे तीन-चार गाड्या असल्याने त्यांच्या भावाने समोरील चालकाला गाडी मागे घेण्याची विनंती केली. मात्र गाडी मागे घेण्याऐवजी त्या गाडीतून दोघे जण खाली उतरले व त्यांनी ठाकर यांना शिवीगाळ केली.
रात्री दहाच्या सुमारास हेच युवक अन्य बारा-तेरा जणांच्या टोळीसह हातात लाकडी दांडके, दगड घेऊन ठाकर यांच्या घरावर चालून आले. घराच्या बाहेर उभे राहून शिवीगाळ करू लागले. या वेळी घराबाहेर आलेले रवी ठाकर यांचे वडील नामदेव ठाकर, भाऊ दिनेश ठाकर, चुलत भाऊ विशाल ठाकर, अशोक ठाकर, राजू ठाकर यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यामध्ये नामदेव ठाकर यांच्या डोक्याला, तर इतरांच्या डोक्याला व पाठीला मार लागला आहे. भाडण सोडविण्यासाठी गेलेल्या रवी ठाकर यांनादेखील मारहाण केली.
याप्रकरणी शिवली येथील नीलेश येवले व राऊतवाडी येथील अक्षय राऊत यांच्यासह बारा ते तेरा जणांच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राऊत याला अटक झाली असून, चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गा जाधव तपास करीत आहेत.