मुकीम अहमद, शफी कादरी यांच्या हत्येसाठी दिली पाच लाखांची सुपारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:41 PM2018-08-21T13:41:41+5:302018-08-21T13:43:05+5:30
अकोला : आप नेते मुकीम अहमद व शफी कादरी या दुहेरी हत्याकांड प्रकरणात एक आणखी नवे वळण समोर आले, या दोघांच्या हत्येची पाच लाख रुपयांमध्ये सुपारी देण्यात आली होती, अशी कबुली कुद्दुस मेकॅनिक व शादाब टाटा यांनी सोमवारी पोलिसांसमोर दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : आप नेते मुकीम अहमद व शफी कादरी या दुहेरी हत्याकांड प्रकरणात एक आणखी नवे वळण समोर आले, या दोघांच्या हत्येची पाच लाख रुपयांमध्ये सुपारी देण्यात आली होती, अशी कबुली कुद्दुस मेकॅनिक व शादाब टाटा यांनी सोमवारी पोलिसांसमोर दिली. या हत्याकांड प्रकरणाचे सूत्रधार कौसर व चांद या दोघांनी ही सुपारी दिली असून, त्यामधील १ लाख २० हजार रुपयांचा अॅडव्हान्सही या दोघांना देण्यात आल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. या दोघांना रविवारी अटक केल्यानंतर सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना २७ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दामले चौकातील केदार मंदार अपार्टमेंटमधील रहिवासी मुकीम अहमद व बुलडाण्याच्या साखरखेर्डा या गावातील त्यांचा सहकारी शफी कादरी हे अकोला शहरातून ३० जुलै रोजी बेपत्ता झाले होते. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी सहा पथकांचे गठन करून, या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, दोघांचेही मृतदेह बुलडाणा जिल्ह्यातील साकर्शा जंगलात आढळले होते. या दोघांच्या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १४ आरोपींना अटक केली असून, यामधील चार जणांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे, तर १० आरोपींपैकी रविवारी अटक केलेल्या अकोट फैलातील मेकॅनिकचा व्यवसाय करणारा अब्दुल कुद्दुस अब्दुल मन्नान व त्याचा साथीदार शेख शादाब टाटा या दोघांची कसून चौकशी केली असता त्यांना कौसर व चांद या मुख्य सूत्रधांरानी मुकीम अहमद व शफी कादरी या दोघांच्या हत्येची पाच लाख रुपयांमध्ये सुपारी दिल्याचे त्यांनी कबुली दिली. कुद्दुस मेकॅनिक याने नवीन टोळी तयार केल्याचेही समोर आले आहे. या टोळीतील पाच जणांना अटक करण्यात आली असून, यामध्ये अहमद खान भुरे खान, शेख इरशाद व रजा उल्लाह शाह यांचा समावेश आहे.
सूत्रधारांनी केला पूर्ण अभ्यास
या हत्याकांड प्रकरणाचे सूत्रधार कौसर व चांद यांनी मुकीम अहमद व शफी कादरी या दोघांची दिवसभराच्या कामकाजासह त्यांच्या पाठीमागे व सोबत राहणाऱ्यांचा अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांची हत्या करण्यासाठी विविध गटातील १५ ते २० जणांना सहभागी केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणात आतापर्यंत १४ जणांना अटक करण्यात आली असली, तरी आणखी ४ ते ५ आरोपींना अटक करणे बाकी असल्याचेही पोलिसांनी सांगितले.