खळबळजनक! पोलीस घरी येताच एकाच कुटुंबातील ५ जणांची सातव्या मजल्यावरून उडी, चौघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 05:36 PM2022-03-25T17:36:46+5:302022-03-25T17:36:59+5:30
पोलिसांनी सांगितल्यानुसार, मृतांमध्ये ४० वर्षीय व्यक्ती, त्याची ४१ वर्षीय पत्नी आणि मेहुणी, ८ वर्षीय मुलगी यांचा मृत्यू झाला आहे. तर १५ वर्षीय मुलाची अवस्था गंभीर आहे.
स्वित्झर्लंडमध्ये पोलिसांच्या दहशतीनं एकाच कुटुंबातील ५ लोकांनी इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या दुर्घटनेत ५ पैकी ४ जणांचा मृत्यू झाला असून १५ वर्षीय मुलगा गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. या जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका गुन्ह्याशी संबधित प्रकरणात पोलीस कुटुंबाच्या घरी आले होते. परंतु त्यानंतर कुटुंबाने जे पाऊल उचललं त्याने सगळेच अधिकारी हादरले.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, Montreux च्या Lake Geneva इथं फ्रेंच कुटुंब राहायला आहे. मागील काही दिवसांपूर्वी स्विस पोलिसांचे एक पथक होम स्कूलिंगच्या प्रकरणात या कुटुंबाच्या घरी अटक वॉरंट घेऊन पोहचले होते. परंतु या प्रकारामुळे कुटुंब घाबरले होते. त्यांनी इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारण्याचा निर्णय घेतला. यात कुटुंबातील ५ जणांचा समावेश आहे. यातील ४ जणांचा दुर्दैवी अंत झाला तर अल्पवयीन मुलगा अद्याप मृत्यूशी झुंज देत आहे.
पोलिसांनी सांगितल्यानुसार, मृतांमध्ये ४० वर्षीय व्यक्ती, त्याची ४१ वर्षीय पत्नी आणि मेहुणी, ८ वर्षीय मुलगी यांचा मृत्यू झाला आहे. तर १५ वर्षीय मुलाची अवस्था गंभीर आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांचे प्रवक्ते अलेक्जेंड्रे बिसेन्ज म्हणाले की, ५ लोकांच्या या कुटुंबाने त्यांच्या फ्लॅटमधून उडी घेतली आहे. ज्यामुळे हा प्रकार घडला. अधिकाऱ्यांनी जेव्हा घराचा दरवाजा ठोठावला तेव्हा आतून कोण आहे? असा आवाज देण्यात आला. तेव्हा बाहेरून उत्तर मिळाले पोलीस, त्यानंतर घरातील आतमधला आवाज पूर्णपणे बंद झाला.
खूप वेळ दरवाजा न उघडल्याने पोलीस अधिकारी तेथून निघून गेले. परंतु तेव्हा सूचना मिळाली की, एका इमारतीच्या बाल्कनीतून काही लोक खाली पडले आहेत. जेव्हा पोलीस त्याठिकाणी पोहचली तेव्हा ज्या घरात केस संबंधात गेलो होतो तेच खाली पडल्याचं पोलिसांना कळालं. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. सुरुवातीच्या चौकशीत या इमारतीतील फ्लॅटमध्ये कुटुंबातील सदस्यांशिवाय अन्य कुणी व्यक्ती नव्हता हे समोर आले आहे. मात्र कुटुंबाने केलेल्या या कृत्याने पोलीस हादरले आहेत.