पाच मोबाईल जप्त: दीड कोटींची रक्कम जप्त; तीन जणांना सूचनापत्र देऊन सोडले
By नरेश रहिले | Published: August 9, 2022 01:58 PM2022-08-09T13:58:34+5:302022-08-09T13:59:03+5:30
हा पैसा हवालाचा आहे की वाममार्गासाठी जात होता या सर्व बाजूंनी तपास देवरी पोलीस करीत आहेत.
गोंदिया: गोंदियावरून राजनांदगावकडे जाणाऱ्या कारमध्ये एक कोटी ४३ लाख ९० हजार रुपये रोख रक्कम देवरी पोलिसांनी पकडली. यात तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या जवळून पाच मोबाईल जप्त करण्यात आले.
गोंदियावरून सीजी ०८ आर ९००० या कार मध्ये एक कोटी ४३ लाख ९० हजार रुपयाची रोख रक्कम आढळल्याची घटना सोमवारच्या मध्यरात्री शिरपूरबांध येथे येथील सीमा तपासणी नाक्यावर घडली. अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार देवरी पोलिसांनी शिरपूर येथे नाकाबंदी करीत कारची तपासणी केली. या कारमध्ये १ कोटी ४३ लाख ९० हजार रुपयाची रोख रक्कम आढळली.
या रकमेबाबत गाडी मधील इसम कमल सुभेलाल गांधी (६०) रा. राजनांदगाव, विनोद प्रकाशसिंह जैन रा. राजनांदगाव व नेमचंद दादूलाल बघेल रा. नाथूनपात्रावर यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी कोणतेही पुरावे सादर न केल्यामुळे ती रोख रक्कम जप्त करण्यात आली. सोबतच जप्त करण्यात आलेल्या वाहनाची किंमत ५ लाख रुपये सांगितले जाते. त्या तिन्ही जणांकडून ५ मोबाईल जप्त करण्यात आले.
मोबाईलची किंमत ६० हजार रुपये सांगितले जाते. या प्रकरणात एकूण १ कोटी ४९ लाख ४१ हजार ९९० रुपयाचा माल जप्त करण्यात आला. या तिन्ही इसमांना सूचना पत्र देऊन सोडण्यात आले. या प्रकरणाची चौकशी पोलीस निरीक्षक रेवचन सिंगणजुडे करीत आहेत. हा पैसा हवालाचा आहे की वाममार्गासाठी जात होता या सर्व बाजूंनी तपास देवरी पोलीस करीत आहेत.