शहापूरमध्ये पकडले पाच मोबाइल चोर, लाखोंचा ऐवज जप्त : कोठडीत रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 02:03 AM2021-02-03T02:03:55+5:302021-02-03T02:04:25+5:30
Crime News : शहापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मोबाइलच्या चोऱ्या होत होत्या. अनेक तक्रारी करूनही चोर सापडत नव्हते. या मोबाइल चोरीच्या घटना शुक्रवारच्या बाजारात अधिक प्रमाणात घडत होत्या.
भातसानगर - शहापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मोबाइलच्या चोऱ्या होत होत्या. अनेक तक्रारी करूनही चोर सापडत नव्हते. या मोबाइल चोरीच्या घटना शुक्रवारच्या बाजारात अधिक प्रमाणात घडत होत्या. दरम्यान, पाच मोबाइल चोरांना पकडण्यात सोमवारी शहापूर पोलिसांना यश आले.
वाफे येथील गणेश शिंगोळे हे संध्याकाळच्या वेळी ब्रिजजवळ उभे असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांना पत्ता विचारून गप्पांमध्ये गुंतवताच मागून येणाऱ्या व्यक्तीने त्यांचा मोबाइल चोरून नेला. शिंगोळे यांनी आरडाओरड केली, मात्र चोरांनी तेथून पोबारा केला. त्यांनी यासंदर्भात पोलीस तक्रार केली.
पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. दोन व्यक्ती कुमार हॉलजवळ असल्याची माहिती मिळताच त्या दोघांची पोलिसांनी चौकशी करताच त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर मात्र एक लाख ७३ हजार किमतीचे मोबाइल व अन्य तपासात ३८ हजाराचे पाच मोबाइल जप्त करण्यात आले.
यामध्ये हैदर राजू सोलंकी (२१), रोहित ऊर्फ अजय सिंग किशोर सिंग राठोड(२२), जलामा गव्हर्मेंट पवार (२२), वैशाली अजयसिंग राठोड (२३) व अजदबाई राठोड (२५) यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. हे सर्व मध्य प्रदेशचे राहणारे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आल्याचे पोलिसांनी प्रसार माध्यमांना सांगितले.
दरम्यान, या चोरांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.