जीएसटी विभागाच्या  पाच अधिकाऱ्यांना अटक; ५० लाखांची लाचखोरी, सीबीआयची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 05:20 AM2024-11-02T05:20:48+5:302024-11-02T05:20:56+5:30

सीबीआयकडून प्राप्त माहितीनुसार, गोरेगावमधील एका कंपनीचे करविषयक प्रकरण हे अधिकारी हाताळत होते.

Five officers of GST department arrested; 50 lakh bribery, CBI action | जीएसटी विभागाच्या  पाच अधिकाऱ्यांना अटक; ५० लाखांची लाचखोरी, सीबीआयची कारवाई

जीएसटी विभागाच्या  पाच अधिकाऱ्यांना अटक; ५० लाखांची लाचखोरी, सीबीआयची कारवाई

मुंबई : करविषयक प्रकरणात एका उद्योजकाकडून ५० लाख रुपयांची लाच उकळल्याप्रकरणी वस्तू व सेवाकर विभागाच्या (जीएसटी) पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना सीबीआयने अटक केली आहे. यापैकी दोन अधिकारी भारतीय महसूल सेवेतील  आहेत तर उर्वरित अधिकारी जीएसटी विभागात अधीक्षक आहेत. जीएसटी विभागाचे अपर आयुक्त दीपक शर्मा, सहआयुक्त राहुल कुमार, अधीक्षक बिजेंद्र जनावा, निखिल अगरवाल आणि नितीन गुप्ता अशी अटक केलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. 

सीबीआयकडून प्राप्त माहितीनुसार, गोरेगावमधील एका कंपनीचे करविषयक प्रकरण हे अधिकारी हाताळत होते. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान या अधिकाऱ्यांनी संबंधित उद्योजकाला अटकेची भीती दाखवत त्याच्याकडे ८० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. शेवटी ५० लाख रुपयांवर तडजोड झाली. मात्र, हे पैसे मिळेपर्यंत या अधिकाऱ्यांनी संबंधित उद्योजकाला १८ तास कार्यालयात बसवून ठेवले होते व त्याचा छळ केला, असा त्यांच्यावर आरोप आहे. या उद्योजकाने आपल्या ओळखीच्या माध्यमातून या पैशांची जुळवाजुळव केल्यानंतर त्याला सोडण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

३० लाख रुपये जप्त 
उद्योजकाने लाचखोरीसंदर्भात सीबीआयकडे तक्रार केली. सीबीआयने तक्रारीची पडताळणी केली. महसूल विभागाकडून संमती मिळाल्यानंतर सीबीआयने महसूल सेवेतील अधिका-यांना अटक केली. त्यानंतर या प्रकरणातील लाचेची ३० लाख रुपयांची रक्कम सीबीआयने जप्त केली आहे.

Web Title: Five officers of GST department arrested; 50 lakh bribery, CBI action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.