गुरू साटम टोळीच्या पाच गुंडांना अटक, खंडणीविरोधी पथकाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 08:38 PM2018-07-13T20:38:55+5:302018-07-13T20:39:28+5:30
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागत होते खंडणी; परदेशात बसून गुरु साटम आपली टोळी चालवतो
मुंबई - मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने गुंड गुरु साटम टोळीच्या पाच जणांना आज जेरबंद केले आहे. बांधकाम व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकाविणाऱ्या या पाच जणांकडून पोलिसांनी दोन पिस्तूल, ५ जिवंत काडतुसे आणि अकरा मोबाईल हस्तगत केले आहेत.
मुंबईतील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला खंडणीसाठी धमक्या येत होत्या. गुरु साटम टोळीचे काही गुंड बांधकामाच्या साईटवर येऊन शस्त्रांचा धाक दाखवून खंडणीसाठी धमकवित होते. काही दिवस या व्यावसायिकाने या गुंडाना पैसे दिले. मात्र, दिवसेंदिवस त्यांच्या मागण्या वाढू लागल्याने हताश झालेल्या व्यावसायिकाने पोलिसात तक्रार केली. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे सोपविण्यात आला. पोलिस उपायुक्त दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय सावंत, पोलिस निरीक्षक सचिन कदम, अरविंद परमार, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सुनील पवार, सुशीलकुमार वंजारी, उपनिरीक्षक कल्पेश देशमुख यांच्या पथकाने धमकाविणाऱ्यांचा मग काढण्यास सुरुवात केली. तांत्रिक पुरावे व इतर माहितीच्या आधारे पोलिसांनी अमोल विचारे, भरत सोलंकी उर्फ अन्वर, राजेश आंब्रे उर्फ भाई, बिपीन धोत्रे, दीपक लोढीया उर्फ सोनी या पाच जणांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली. आरोपी अमोल याला खुनाच्या आरोपाखाली याआधी अटक करण्यात आली होती. तर राजेशविरोधात ५० हुन अधिक गुन्हे दाखल असून तो थेट साटमच्या संपर्कात असल्याचे तपासात उघड झाले आहे. दीपक आणि अमोल याच्यावर धमकाविण्याची जबाबदारी देण्यात आली होती. तसेच भरत सोलंकी हा पालिकेत सफाई कर्मचारी आहे. पालिकेत नोकरी करताना व्यावसायिकांची माहिती काढून देण्याचे काम भरत करायचा अशी माहिती गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिली. पुढे त्यांनी बिपीन हा आर्थिक व्यवहार सांभाळून परदेशात साटमला पैसे पुरविण्याचे काम करतो. यावरून परदेशात बसून गुरु साटम आपली टोळी चालवीत असल्याचे या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. या पाच जणांकडे गुरु साटम याने मुंबईतील व्यावसायिकांची यादी दिली होती. त्यानुसार पाच जणांची खंडणीवसुली सुरु होती. या पाच जणांनी मुंबईसह बाहेरच्या व्यावसायिकांना धमकाविल्याचे उघड झाले आहे. पाच आरोपीना मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने २१ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे असे सांगितले.