दरोडा टाकणार होते पाच जण मिळून, अंधारात एक गेला पळून, चौघांना अटक
By दयानंद पाईकराव | Published: January 6, 2024 05:17 PM2024-01-06T17:17:36+5:302024-01-06T17:20:54+5:30
ही घटना शुक्रवारी रात्री १० ते ११.१५ वाजताच्या दरम्यान घडली.
नागपूर : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट पाचने शस्त्रासह अटक केली आहे. दरम्यान अंधाराचा फायदा घेऊन एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री १० ते ११.१५ वाजताच्या दरम्यान घडली.
साहिल देवराम गजभिये (वय ३०, रा. दुर्गानगर, पारडी), विशाल राधश्याम बावणे (वय २३, रा. नवकन्या नगर, भरतवाडा, कळमणा), राजेश कैलास सिरसौधिया (वय ४१, रा. यशोधरानगर, नवकन्या नगर, भरतवाडा) आणि अंकेश उर्फ अनिकेत मोहन मंडलीकर (वय २७, रा. शिवशंभुनगर, भरतवाडा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अंधाराचा फायदा घेऊन आरोपींचा पाचवा साथीदार हर्ष इंगाले, (वय २८, रा. विजयनगर, कळमणा) हा अंधाराचा फायदा घेऊन पळुन गेला.
गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पथक कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना आरोपी पावनगाव रोडवर नविन हायवेच्या बाजुला मोकळ्या मैदानात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे धाड टाकून आरोपींनाअटक केली. त्यांच्या ताब्यातून तीन लोखंडी चाकु, तीन मोबाईल, एक दुचाकी, मिरची पावडर, दोरी असा एकुण १ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध कलम ३९९, ४०२, सहकलम ४, २५, १३५ नुसार गुन्हा दाखल करून फरार आरोपीचा शोध सुरु केला आहे.