शहरात वेगवेगळ्या अपघातांमध्ये पाच जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 09:53 AM2021-03-09T09:53:11+5:302021-03-09T09:53:40+5:30
Accident News: वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून बेशिस्त चालक वाहन चालवितात. त्यामुळे अपघात होतात. याप्रकरणी वाहनचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून बेशिस्त चालक वाहन चालवितात. त्यामुळे अपघात होतात. अशाचप्रकारे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये पाच जण जखमी झाले. याप्रकरणी वाहनचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Five people were injured in various accidents in pune)
भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वार जखमी झाले. भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे-नाशिक महामार्गावर सोमवारी (दि.८) हा अपघात झाला. मयूर शरद लोंढे (वय २९, रा. दिघी, मूळ रा. मनमाड, ता. नांदगाव, जि. नाशिक) व अशोक संपत सातव, अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. लोंढे यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांचा मित्र सातव हे दोघे दुचाकीवरून जात होते. त्यावेळी भरधाव चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात फिर्यादी व त्यांचा मित्र जखमी झाले. तसेच दुचाकीचे नुकसान झाले. अपघातानंतर चारचाकी चालक न थांबता निघून गेला.
दुसरा अपघात मुंबई - बेंगळुरू महामार्गावर देहूरोड येथे रविवारी (दि. ७) सायंकाळी सहाच्या सुमारास झाला. निखिल बाजीराव पाटील (वय २६, रा. कर्वेनगर, पुणे), यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे दुचाकीवरून जात असताना चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात फिर्यादी तसेच त्यांचा मित्र वैभव हे दोघे जखमी झाले. चारचाकी वाहन चालक अपघातानंतर न थांबता निघून गेला. या अपघातात दुचाकीचे नुकसान झाले.
अपघाताची तिसरी घटना वाकड येथील १६ नंबर बस स्टॉप येथे सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली. रेश्मा विजय पालांडे (वय ४१, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीने त्यांना धडक दिली. यात फिर्यादी यांना दुखापत होऊन त्या जखमी झाल्या.