बातम्यांच्या आधारावर दाखल झालेल्या गुन्ह्यात पाच जणांना तुुरुंगवास
By उद्धव गोडसे | Published: June 17, 2023 09:23 PM2023-06-17T21:23:22+5:302023-06-17T21:24:04+5:30
शिकारीच्या उद्देशाने शिरले होते जंगलात, राधानगरी न्यायालयात निर्दोष ठरलेले आरोपी जिल्हा न्यायालयात दोषी
कोल्हापूर : शिकारीच्या उद्देशाने राधानगरी परिसरातील वन विभागाच्या हद्दीत घुसून बेकायदा आग पेटवणे, बांधकाम करणे आणि शस्त्र घेऊन फिरल्याबद्दल जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) एस. एस. तांबे यांनी शनिवारी (दि. १७) पाच जणांना दोषी ठरवून त्यांना शिक्षा सुनावली. दोघांना एक वर्ष साधी कैद व एक हजार रुपये दंड, तर तिघांना तीन वर्ष साध्या कैदेची शिक्षा सुनावली. या गुन्ह्यातील अन्य सहा जणांची निर्दोष मुक्तता झाली. आरोपी आणि वन विभागातील काही कर्मचा-यांनी संगनमताने दपडलेला गुन्हा वर्तमानपत्रांमधील बातम्यांमधून समोर आल्यानंतर संशयितांवर गुन्हा दाखल झाला होता.
सरकारी वकील समीर एस. तांबेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२१ मध्ये शिकारीच्या उद्देशाने राधानगरी वन विभागाच्या हद्दीत १० जण घुसले होते. हा प्रकार निदर्शनास येताच वन विभागाचे कर्मचारी योगेश गावित आणि शफीक आगा यांनी संशयितांवर गुन्हा दाखल करण्याऐवजी त्यांची बंदूक बेकायदेशीररित्या जप्त करून त्यांच्याकडून एक लाख रुपये उकळले. घटनेनंतर सुमारे १५ दिवसांनी वर्तमानपत्रातील बातम्यांमधून हा प्रकार समोर आला. तसेच संशयितांचे जंगलातील काही व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले.
चौकट - आधी निर्दोष ; अपीलात दोषी
बातम्यांच्या आधारावर वन विभागातील तत्कालीन वरिष्ठ अधिका-यांनी राधानगरी पोलिस ठाण्यात संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. डिसेंबर २०२१ मध्ये राधानगरी न्यायालयाने सर्व संशयितांना निर्दोष मुक्त केले. मात्र, सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा न्यायालयात अपील करण्यात आले. या खटल्यात सरकारी वकील तांबेकर यांनी पुरावे आणि साक्षींच्या आधारे जोरदार युक्तीवाद केला. त्यानुसार न्यायाधीश तांबे यांनी पाच आरोपींना दोषी ठरवून शिक्षा सुनावली.
यांना झाली शिक्षा
शस्त्र कायद्यानुसार दोषी ठरलेले तेलेस फ्रान्सीस फर्नांडिस (वय ६५ रा. बाचणी, ता. कागल), धोंडीराम रामचंद्र राणे (वय ३२, रा. लिंगाचीवाडी, ता. राधानगरी), योगेश पुनाजी गावित (वय ३५ रा. वन वसाहत, हत्तीमहल, राधानगरी) या तिघांना ३ वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची अशी शिक्षा झाली. कैतान अगस्तिन डिसोजा (वय ५३, रा. बाचणी) आणि विश्वास ज्ञानू कांबळे (वय ६५, रा. आडोली, ता. राधानगरी) या दोघांना एक वर्ष सक्तमजुरी व १ हजार रुपये दंडाची शिक्षा झाली.