‘लोन ॲप’चे धागेदोरे कर्नाटकात, पाच वसुली एजंटना अटक; राज्य सायबर सेलची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 06:01 AM2022-06-15T06:01:33+5:302022-06-15T06:01:47+5:30
लोन ॲपच्या तक्रारी आल्यानंतर अखेर राज्याच्या सायबर सेलने तपासाची चक्रे वेगाने फिरवत आणि कर्नाटकातील टोळक्याच्या मुसक्या आवळल्या.
मुंबई :
लोन ॲपच्या तक्रारी आल्यानंतर अखेर राज्याच्या सायबर सेलने तपासाची चक्रे वेगाने फिरवत आणि कर्नाटकातील टोळक्याच्या मुसक्या आवळल्या. कर्जदारांची छायाचित्रे मॉर्फ करूनपीडितांच्या संपर्कातील लोकांना ती शेअर करण्यात त्यांचा सहभाग असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
धुळे जिल्ह्यातील फसवणूक प्रकरणी कर्नाटकातील धारवाडमधील अहमद हुसेन (२७) याच्या अटकेनंतर कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातून सुहेल सय्यद (२४), सय्यद मोहम्मद अथर (२४), मोहम्मद कैफ कादारी (२२) व मुफ्तियाज पीरजादे यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
कुणी एमबीए, तर कुणी आयटीवाला
सय्यद हा एमबीए, तर अथरने बारावी पूर्ण केल्यानंतर आयटी अभ्यासक्रम केला आहे. कादरी संगणक विज्ञान अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात आहे, तर पीरजादे यांने बीकॉम पदवी पूर्ण केली आहे. आरोपी कर्नाटकातील वेगवेगळ्या ठिकाणी १२ ते १५ हजार रुपये पगारावर कार्यरत होते, तर सय्यद हा २० हजार रुपये मासिक पगार घेत होता.
शंभर कॉल आणि धमक्यांची स्क्रिप्ट !
वसुली एजंटांना दिवसा ४० हजार रुपये वसूल करण्याचे लक्ष्य देण्यात आले होते. दररोज सुमारे १०० कॉल करणे आवश्यक होते. तसेच यासाठी त्यांना विशिष्ट स्क्रिप्ट दिली जात होती, ज्यात कर्जदारांना पाठविलेल्या अपमानास्पद आणि धमकीच्या संदेशासह कर्जदारांचे मॉर्फ फोटो त्यांच्या नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देऊन संभाषण कसे सुरू करावे, हे सांगणारी स्क्रिप्ट होती.