परभणीत मोंढा बाजारपेठेतील पाच दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 04:17 PM2020-06-01T16:17:55+5:302020-06-01T16:18:40+5:30

१५ दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र आदेश काढून कृषी बाजारपेठ सुरु ठेवण्याची सवलत दिली होती.

Five shops in Mondha market in Parbhani were blown up | परभणीत मोंढा बाजारपेठेतील पाच दुकाने फोडली

परभणीत मोंढा बाजारपेठेतील पाच दुकाने फोडली

Next

परभणी: खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वीच शहरातील मोंढा बाजारपेठेतील पाच दुकानांचे शटर वाकवून चोरट्यांनी २५ ते ३० हजार रुपयांची रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना १ जून रोजी पहाटे उघडकीस आली. या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील बाजारपेठा बंद आहेत. १५ दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र आदेश काढून कृषी बाजारपेठ सुरु ठेवण्याची सवलत दिली होती. त्यामुळे आठवडाभरापासून बाजारपेठेत शेतकऱ्यांची चहलपहल वाढली आहे. व्यापाऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात कृषीमाल विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. मोंढ्यातील महेश मणियार यांचे किसान कृषी उद्योग हे दुकान असून शटर वाकवून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. फर्निचरची नासधूस करुन गल्ल्यातील रोख १० हजार रुपये चोरुन नेले.

या दुकानाच्या शेजारीच प्रमोद नंदलाल बंग यांच्या भुसार दुकानाचेही शटर वाकवून चोरट्यांनी चोरी केली आहे. त्या शेजारीच साई समर्थ या दुकानाचेही शटर वाकविण्यात आले. मात्र चॅनेल गेटमुळे चोरट्यांना दुकानात प्रवेश करता आला नाही. याच भागातील मारोती लोंढे यांचे सरस्वती  अ‍ॅग्रो एजन्सी तसेच त्याच्या बाजुला असलेल्या विशाल अ‍ॅग्रो एजन्सी या दोन्ही दुकानाचे शटर वाकवून रोख रक्कम चोरट्यांनी लांबविली. पाचही दुकानातून साधारणत: २५ ते ३० हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी पळविली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून गुन्हा नोंद झाला आहे.

Web Title: Five shops in Mondha market in Parbhani were blown up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.