परभणीत एकाच रात्री चोरट्यांनी फोडली पाच दुकाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 03:54 PM2018-07-17T15:54:18+5:302018-07-17T15:55:08+5:30
शहरातील खानापूर फाटा परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एकाच रात्री सहा दुकाने फोडून नगदी रक्कम व दुकानातील साहित्य असा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली.
परभणी : शहरातील खानापूर फाटा परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एकाच रात्री सहा दुकाने फोडून नगदी रक्कम व दुकानातील साहित्य असा ६० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील खानापूर फाटा भागात असलेल्या यशवंतनगरातील या चोरीच्या घटना घडल्या. १६ जुलै रोजी पहाटे साधारणत: अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. दीपक कुचे यांच्या मालकीचे यशवंतनगरातील तुळजाभवानी मेडिकल या दुकानाचे शटर वाकवून दुकानातील नगदी ३० हजार रुपये पळविले. त्याचप्रमाणे या दुकानाच्या बाजूलाच असलेल्या राजेंद्र येलपुल्ला यांच्या माऊली एंटरप्राईजेस या दुकानातील १ हजार रुपये, श्याम शिंदे यांचे युनिटी मेडिकेअर दुकानातील २ हजार रुपये आणि संतोष वगदे यांच्या शिवाणी रेडीमेड ड्रेसेस या दुकानातील २० रेनकोट, ३० जीन्स पॅन्ट, १० छत्र्या, अंडरविअरचे ६ बॉक्स असा २६ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला.
तसेच वसमत रोडवरील जागृती कॉम्प्लेक्समधील शाल्वी लेडीज वेअर दुकानाचे शटर वाकवून १ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. तसेच जुने आरटीओ कार्यालय परिसरातील कृषीधन इलेक्ट्रीक्स दुकानाचे शटर तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. एकाच रात्री सहा दुकान फोडल्याने या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या प्रकरणी तुळजाभवानी मेडीकलचे मालक दीपक दीनानाथ कुचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हे.कॉ.विठ्ठल राठोड, विनोद मुळे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
मुख्य रस्त्यापर्यंत काढला माग
चोरीच्या घटनेनंतर नवा मोंढा पोलीस ठाण्याचे निरीक्षक नृसिंह ठाकूर यांनी घटनास्थळाला भेट दिली. तसेच श्वान पथकास पाचारण केले होते. श्वानाने दुकानांपासून ते वसमत रस्त्यापर्यंतचा माग काढल्याची माहिती तपासी अधिकारी हे.कॉ.विठ्ठल राठोड यांनी दिली.
चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात
या परिसरात असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहेत. विशेष म्हणजे बोलेरो गाडी घेऊन हे चोरटे चोरी करण्यासाठी आले होते. चोरी करण्यापूर्वी चार चोरटे सीसीटीव्ही कॅमेरा फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे कॅमेऱ्यात दिसत आहे. मात्र या कॅमेऱ्यात गाडीचा क्रमांक दिसत नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे.