चोरीतील पाच बुलेट जप्त, लातुरात तिघांच्या मुसक्या आवळल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 21:01 IST2020-08-28T20:59:05+5:302020-08-28T21:01:31+5:30
न्यायालयीन कोठडी : एमआयडीसी पोलिसांची कारवाई; बुलेट चोरणारी टोळी सक्रीय

चोरीतील पाच बुलेट जप्त, लातुरात तिघांच्या मुसक्या आवळल्या
लातूर : शहरातील वेगवेगळ््या भागातून चोरीला गेलेल्या पाच बुलेट एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी जप्त केल्या असून, याप्रकरणी तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांना लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, एकाला न्यायालयीन कोठडी तर दोघांचा जामीन मिळाला आहे.
पोलिसांनी सांगितले, लातूर शहरातील विशाल नगर, आवंतीनगर, एमआयडीसी कॉर्नर, वाल्मिकी नगर आणि शाम नगर परिसरातून गत महिनाभरात पाच बुलेट अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली होती. दरम्यान, याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हेही दाखल करण्यात आले होते. मोटारसायकल चोरणाºया टोळीबरोबरच आता बुलेट चोरी करणारी टोळी सक्रीय झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. याबाबत पोलीस निरीक्षक संजिवन मिरकले यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी मोठ्या शिताफीने भरत रुकमाजी संपते (२० रा. पानगाव, ता. रेणापूर), करण लक्ष्मण फड (१९ रा. इनामवाडी-पानगाव) आणि संभाजी सतीश गिरी (१९ रा. सोमनवाडी ता. अंबाजोगाई) यांना ताब्यात घेतले. प्रारंभी या तिघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, पोलिसी खाक्या दाखवताच तिघांनीही चोरी केलेल्या बुलेट (किंमत १ लाख ७५ हजार) पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.