साडेपाच हजार पुणेकरांची ऑनलाईन फसवणूक : हॅकर्सनी घातला कोट्यवधींना गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 06:00 AM2019-01-30T06:00:00+5:302019-01-30T06:00:07+5:30
सुरक्षित असलेले पण सायबर साक्षर नसलेले असंख्य लोक हॅकर्सने दाखविलेल्या आमिषाला बळी पडून त्यांना आपल्या खात्याची माहिती देतात व त्यानंतर हॅकर्स त्यांच्या खात्यातील रक्कम काढून घेतात़.
विवेक भुसे
पुणे : बँकेतून बोलत असल्याचे सांगून, तुम्हाला लॉटरी लागली आहे, विम्याचे पैसे मिळवून देतो, अशी असंख्य कारणे सांगून हॅकर्सनी वर्षभरात तब्बल साडेपाच हजार पुणेकरांच्या बँक खात्यातून कोट्यावधींची रक्कम लंपास केली आहे़. पुणे सायबर गुन्हे शाखेने वर्षभरा ४९ आरोपींना अटक करण्यात यश मिळविले आहे़.
बँकेतून कोणीही फोन करुन तुमचा पासवर्ड मागत नाही़. कोणालाही बँक खात्याची माहिती देऊ नका, असे बँका तसेच पोलिसांकडून जनजागृती केली जात असते़. तरीही सुरक्षित असलेले पण सायबर साक्षर नसलेले असंख्य लोक हॅकर्सने दाखविलेल्या आमिषाला बळी पडून त्यांना आपल्या खात्याची माहिती देतात व त्यानंतर हॅकर्स त्यांच्या खात्यातील रक्कम काढून घेतात़.
भारतीय कंपन्यांशी संबंधित असलेले परदेशी व्यापारी कंपन्यांचे ईमेल हॅक करुन परस्पर दोन कंपन्यांमध्ये होत असलेले आर्थिक व्यवहाराबाबत माहिती घेऊन परदेशी व्यापारी कंपन्यांचे फेक ईमेल आयडी बनवून भारतीय कंपन्यांशी ई मेलद्वारे संपर्क साधून दुसऱ्या बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले जाते़.
नोकरीसाठी नामवंत कंपन्यांच्या साईटसारखी फेक साईट बनवून त्याद्वारे नोकरीचे आमिष दाखवून तरुण तरुणींची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जात असल्याचे सर्वाधिक गुन्हे दाखल होत आहे़.
पुणे सायबर शाखेकडे आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे वर्षभरात ५ हजार ५०७ अर्ज आले होते़. त्यापैकी ४ हजार २२२ अर्ज पुढील कार्यवाहीसाठी संबंधित पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले होते़. त्यापैकी ६८० प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले़ तर ६०५ अर्ज दप्तरी दाखल केले गेले़
या प्रकरणात ४९ आरोपींना सायबर सेलने अटक केली़.
या वर्षभरात सर्वात मोठा सायबर हल्ला कॉसमॉस बँकेच्या सर्व्हर करण्यात आला होता़. प्रोक्सी सर्व्हर तयार करुन हकर्सनी एकाच वेळी २९ देशातून अडीच हजार क्लोन व्हिसा आणि रुपे कार्डचा वापर करुन तब्बल ९४ कोटी रुपये लंपास करण्यात आले होते़. याप्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी प्रत्यक्ष पैसे काढणाऱ्या ११ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून ६ लाख रुपये जप्त केले आहेत़. या प्रकरणात पोलिसांनी इंटरपोलचीही मदत घेतली आहे़
३०० जणांना मिळाले ४ कोटी १२ लाख परत
ज्या ऑनलाईन तक्रारीत ओटीपी शेअर केला गेला असेल,तर त्या प्रकरणात बँकेकडून फसवणूक झालेली रक्कम रिफंड केली जात नाही़ अशा प्रकरणात पैसे विविध मर्चंट/ वॉलेटमध्ये पैसे गेले असतात़. सायबर सेलकडून संबंधितांना तातडीन मेलद्वारे पत्रव्यवहार करुन अर्जदारांना रक्कम परत मिळवून दिली जाते़. त्यात प्रामुख्याने नोकरीच्या बहाण्याने, क्रेडीट कार्ड असतानाही फसवणूक झाली़. तसेच कोणतीही बँकेची माहिती शेअर केली नसतानाही त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यात आले, अशा सुमारे ३०० अर्जदारांबाबत सायबर सेलने संबंधित मर्चंट / वॉलेट यांच्याशी संपर्क साधून अर्जदारांना त्यांचे पैसे परत मिळवून दिले़. २०१८ मध्ये सायबर सेलने अशा प्रकारे ४ कोटी १२ लाख ५५ हजार ९०५ रुपये रिफंड मिळवून दिला आहे़.
सायबर सेलची कामगिरी (२०१८)र्
५५०७ आलेले अज
६८० गुन्हे दाखल
४९ अटक आरोपी
३०० रिफंड मिळवून दिलेले अर्जदार
४ कोटी १२ लाख ५५ हजार ९०५ रिफंड रक्कम
६०५ दप्तरी दाखल अर्ज
४२२२ कारवाईसाठी पोलीस ठाण्याकडे पाठविलेले अर्ज