घंटागाडीवरील पाच कामगारांना केली जबर मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 01:14 AM2020-11-20T01:14:37+5:302020-11-20T01:14:41+5:30
कामगारांचे कामबंद आंदोलन : बारावे येथे कचरा टाकण्यास मज्जाव केल्याने झाला वाद
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : घंटागाडीवरील कामगार बारावे गावात बुधवारी रात्री कचरा टाकण्यासाठी गेले असताना तेथील रहिवाशांनी त्यांना कचरा टाकण्यास विरोध केला. तसेच पाच कामगारांना मारहाण केली. त्याच्या निषेधार्थ घंटागाडी कामगारांनी गुरुवारी कामबंद आंदोलन केले. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणचा कचरा उचलण्यात आला नाही.
केडीएमसीने आर ॲण्ड डी कंपनीला कचरा उचलण्याचे कंत्राट दिले आहे. या कंत्राटदाराचे कामगार बुधवारी रात्री घंटागाडी घेऊन बारावे येथे कचरा रिकामा करण्यासाठी गेले असता तेथील रहिवाशांनी त्यांना विरोध केला. मनपा अधिकाऱ्यांनी याच ठिकाणावर कचरा टाकण्यास सांगितल्याचे कामगारांनी त्यांना सांगितले. मात्र, रहिवाशांनी त्यांचे न ऐकता त्यांना मारहाण केली. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळपासून कामगारांनी कामबंद आंदोलन केले. त्यात २२० घंटागाडी कामगार सहभागी झाले आहेत. त्यामुळे गुरुवारी ‘क’ आणि ‘ब’ प्रभागांतील कचरा उचलला गेला नाही.
अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष निखिल चव्हाण यांनी कामगारांच्या वतीने आवाज उठविला आहे. महापालिका मुख्यालयात धाव घेऊन त्यांनी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांची भेट घेतली. अशीच परिस्थिती असेल तर कामगारांनी काम कसे करायचे, असा सवाल कामगार संघटनेने केला आहे.
‘स्मशानभूमीच्या जागेवर
कचरा टाकू नका’
nकामगारांना मारहाण केल्याप्रकरणी ग्रामस्थांनी सांगितले की, कचरा टाकण्यात आलेली जागा ही ग्रामस्थांच्या स्मशानभूमीची जागा आहे. या जागेवर ग्रामस्थांनी संरक्षक भिंत उभारली आहे.
nया जागेवर मनपाच्या कचरा कंत्राटदाराचे कामगार कचरा टाकतात. तीन दिवसांपासून त्यांना मज्जाव केला जात आहे. तरीही त्यांच्याकडून वारंवार कचरा टाकला जात असल्याने कामगार व ग्रामस्थांमध्ये वाद झाला.
nग्रामस्थांनीही अतिरिक्त आयुक्त पवार यांना निवेदन देऊन स्मशानभूमीच्या जागेवर कचरा न टाकण्याच्या सूचना कंत्राटदाराला द्याव्यात, अशी मागणी केली आहे.