पाच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार : नागपुरातील पारडीत वातावरण संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 12:49 AM2019-12-20T00:49:37+5:302019-12-20T00:51:40+5:30
पाच वर्षीय चिमुरडीसोबत अश्लील चाळे करून अत्याचार करणाऱ्या नराधमाला पारडी पोलिसांनी अटक केली. गुरुवारी दुपारी पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाच वर्षीय चिमुरडीसोबत अश्लील चाळे करून अत्याचार करणाऱ्या नराधमाला पारडी पोलिसांनी अटक केली. गणेश बोरकर (वय ४०) असे आरोपीचे नाव आहे. तो भांडेवाडीत राहतो. गुरुवारी दुपारी पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली.
पीडित मुलगी अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. तिचे आईवडील रोजमजुरी करतात तर, आरोपी बोरकर अट्टल दारुड्या आहे. मिळेल ते काम करून पैसे आले की ते सर्वच्या सर्व दारूत उडवून तो इकडे तिकडे शिव्या देत फिरत असतो. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे मुलीचे आईवडील कामावर गेले. दुपारी १२ च्या सुमारास ती आणि तिची ११ वर्षीय बहीण घरासमोर खेळत असताना आरोपी बोरकर दारूच्या नशेत झोकांड्या देत तेथे आला. त्याने मोठ्या मुलीचा हात पकडला. तिच्या घरी कुणी नसल्याचे लक्षात आल्याने त्याने तिला तिच्याच घरात ओढत नेण्याचा प्रयत्न केला. तिने बोरकरच्या हाताला झटका मारून पळ काढला. काही अंतरावर तिचे आजोबा होते, त्यांना तिने आरोपी बोरकर घरात शिरल्याचे सांगितले. त्यामुळे आजोबा धावतपळत घरी आले. यावेळी नराधम बोरकर पाच वर्षीय चिमुरडीसोबत नको तो प्रकार करताना दिसला. आजोबाने आरडाओरड केल्याने आरोपी बोरकर शिवीगाळ करीत पळून गेला. त्यानंतर दुपारी ४ च्या सुमारास पीडित मुलीची आई घरी परतली. तिला हा प्रकार कळाला. तिने शेजाऱ्यांना सांगितले. त्यामुळे परिसरात संतप्त वातावरण निर्माण झाले. शेजाºयांसोबत मुलीला घेऊन आईने सरळ पारडी ठाण्यात धाव घेतली. ठाणेदार सुनील चव्हाण यांनी तिची तक्रार ऐकताच आरोपीच्या घराकडे धाव घेतली. आरोपी दारूच्या नशेत बरळत पडला होता. संतप्त नागरिक त्याला चोप देण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतले. त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पीडित चिमुरडीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी आरोपी बोरकरविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे पारडीतील वातावरण संतप्त झाले होते.