प्राणघातक हल्लाप्रकरणी एकास पाच वर्ष सक्तमजुरी, ९ वर्षांपूर्वीचा गुन्हा
By राजन मगरुळकर | Published: July 4, 2023 08:24 PM2023-07-04T20:24:01+5:302023-07-04T20:24:59+5:30
परभणी जिल्हा न्यायालयाने मंगळवारी दिला निकाल
राजन मंगरुळकर
परभणी : फिर्यादी महिला तसेच तिचा पती यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या प्रकरणात दाखल गुन्ह्यामध्ये जिल्हा न्यायालयाच्या क्रमांक दोनचे न्यायाधीश ए.ए.शेख यांनी मंगळवारी निकाल दिला. यामध्ये आरोपीस पाच वर्षांची सक्तमजुरी व पंधरा हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
खानापूर भागातील सविता राजेश पंडित यांनी सहा डिसेंबर २०१४ मध्ये नवा मोंढा ठाण्यात फिर्याद दिली होती.
फिर्यादी सविता पंडित व त्यांचा मुलगा आणि त्यांचा भाऊ घरी असताना फिर्यादीच्या भावाच्या घरी तिचे पती आले. फिर्यादी व पती राजेश पंडित हे स्वतःच्या घराकडे खानापूर फाट्याकडे जाताना आरोपी बाबुराव नितनवरे, पांडुरंग पंडित, सिद्धूोधन नितनवरे, नागसेन नितनवरे, मुंजा पंडित, राहूल लहाडे, रवी लहाडे, गोविंद लहाडे, सिद्धांत उर्फ टायगर नितनवरे, सागरबाई पंडित, विद्याबाई नितनवरे, संध्या लहाडे, धृपताबाई पंडित हे सर्वजण आले व त्यांनी शिवीगाळ करून लहान मुलांच्या भांडणावरून तुझ्या नवऱ्याला पुणे येथून का बोलावून घेतले असे म्हंटले. पांडुरंग पंडित यांनी फिर्यादीच्या डोक्यात, पाठीवर, दोन्ही हातावर तलवारीने मारून जखमी केले. तसेच फिर्यादीचा नवरा राजेश पंडित यास तलवारीने पोटात, डोक्यात, हातावर वार केले. याप्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये न्यायालयात तपास करून तत्कालीन तपासणी अंमलदार एस.एस.वाघमारे, एस.एस. काझी यांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. मंगळवारी जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश ए.ए.शेख यांनी आरोपी पांडुरंग काशिनाथ पंडित यास कलम ३०७ भादविनुसार पाच वर्षाची सक्तमजुरी व दंड १५ हजार रुपये अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्या साधी कैद, एक महिन्याची सुनावली. तसेच फिर्यादीचा नवरा राजेश पंडित याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी आरोपीस पाच वर्ष सक्तमजुरी व दंड तीस हजार अशी शिक्षा सुनावली. सरकारतर्फे जिल्हा प्रमुख सरकारी अभियोक्ता ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक सरकारी अभियोक्ता बाबासाहेब घटे यांनी काम पाहिले. पोलीस अधीक्षक रागसुधा.आर.यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी संतोष सानप, पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, शिवाजी भांगे, प्रदीप रणमाळ, प्रमोद सूर्यवंशी यांनी कामकाज पाहिले.
दहा साक्षीदार तपासले.
सदरील प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी व तिचे पती आणि वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष मोलाची ठरली. सरकारी वकील बाबासाहेब घटे यांनी अंतिम युक्तीवाद केला.