छाेटा राजनच्या नावाने खंडणी उकळणाऱ्या आराेपींना पाच वर्षे सश्रम कारावास

By जितेंद्र कालेकर | Published: March 2, 2024 12:29 AM2024-03-02T00:29:44+5:302024-03-02T00:30:03+5:30

ठाणे न्यायालयाचा निकाल, आरोपी अशाेक खरातने केला हाेता मनसे नेते संदीप देशपांडेंवर हल्ला

Five years of rigorous imprisonment for the accused who extorted extortion in the name of Chheta Rajan | छाेटा राजनच्या नावाने खंडणी उकळणाऱ्या आराेपींना पाच वर्षे सश्रम कारावास

छाेटा राजनच्या नावाने खंडणी उकळणाऱ्या आराेपींना पाच वर्षे सश्रम कारावास

जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: परदेशी माेबाइल क्रमांकावरून छोटा राजन व अनिस भाई का आदमी असल्याचे सांगत नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाकडे २५ लाखांच्या खंडणीची मागणी करून ती न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या अशोक खरात (५४) आणि दुर्गाप्रसाद पिचीर राव (३७) या दोघांना ठाणे जिल्हा न्यायाधीश ए. एन. सिरसीकर यांनी गुरुवारी दोषी ठरवत पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यात आरोपी अशोक खरात याचा समावेश असून, सद्य:स्थितीत ताे कारागृहात आहे. हल्ला झाला त्यावेळी आरोपी जामिनावर बाहेर होता, अशी माहिती विशेष सरकारी वकील संजय मोरे यांनी दिली.

आरोपी खरात आणि राव हे दोघे नवी मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाला परदेशी आणि इतर वेगवेगळ्या क्रमांकांवरून फोन करीत हाेते. छोटा राजन आणि अनिसभाई का आदमी है, असे बोलून खंडणीची मागणी केली. खंडणी न दिल्यास त्यांच्याकडून त्या व्यावसायिकाला जिवे मारण्याची धमकी दिली हाेती. त्यामुळे संबंधित व्यावसायिकांनी नवी मुंबईच्या खंडणी विरोधी पथकात तक्रार केली हाेती. याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात २०१० मध्ये खंडणीसह मोक्कांतर्गत गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी त्यांना अटक केली. या खटल्याची ठाणे न्यायालयाचे न्यायाधीश ए. एन. सिरसीकर यांच्या न्यायालयात २९ फेब्रुवारी राेजी सुनावणी झाली.

सरकारी वकील मोरे यांनी सादर केलेले पुरावे आणि नऊ साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून दाेन्ही आराेपींना पाच वर्षे सश्रम कारावासासह एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास एक महिना साध्या कैदेची शिक्षा भोगावी लागणार आहे. तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी तपास अधिकारी म्हणून, तर पैरवी अधिकारी म्हणून तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र चित्ते, कोर्ट अंमलदार पोलिस हवालदार ए. सी. महाडिक, पोलिस नाईक डी. एस. रोंगटे आदींनी काम पाहिले.

खरात हा मनसे नेत्याच्या हल्ल्यातील मारेकरी

आरोपी अशोक खरात हा खंडणीच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला हाेता. त्या हल्ल्यात खरात याच्यावर मारहाणीचा आरोप आहे. त्या गुन्ह्यात ताे कारागृहात असल्याचे विशेष सरकारी वकील मोरे यांनी सांगितले.

Web Title: Five years of rigorous imprisonment for the accused who extorted extortion in the name of Chheta Rajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे