अमरावतीत अन्न व औषध प्रशासनाची धाड, १२० किलो पनीर जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 01:53 PM2022-10-04T13:53:16+5:302022-10-04T13:54:31+5:30
जप्त करण्यात आलेल्या या पनीरची चाचणी करण्यासाठी काही नमुने घेण्यात आले आहे
मनीष तसरे
अमरावती - पुण्यातील शिरुरवरून अमरावतीत पोहचलेले १२० किलो संशयित पनीर अन्न व औषधी प्रसाशनकडून ताब्यात घेण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी धाड टाकली असता, विकेत्याकडे अन्न व औषधी विभागाचा परवाना नसल्याचेही उघडकीस आले. आज सकाळी ९:३० दरम्यान अमरावती शहरातील महादेव खोरी परिसरात १२० किलो पनीर शहरात येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने अतुल अरुण राऊत ( २८), रा सातुर्णा, अमरावती याला ताब्यात घेऊन १२० किलो पनीर जप्त केले आहे. याची किंमत २८ हजार ५६० रुपये आहे,
जप्त करण्यात आलेल्या या पनीरची चाचणी करण्यासाठी काही नमुने घेण्यात आले आहे. हे पनीर वापरण्यास योग्य आहे की नाही हे चाचणी अहवाल आल्यानंतरच कळवता येईल, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनाने दिली आहे. चाचणी अहवाल येण्यास १४ दिवसांचा कालावधी आहे. सदर जप्त केलेले पनीर विक्रेत्याकडे परवाना नसल्याने व पनीर हे नाशवंत असल्याने हा पनीर साठा नष्ट करण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे. या कारवाईत भाऊराव चव्हाण व गजानन गोरे अन्न सुरक्षा अधिकारी आणि पोलिस् आयुक्त कार्यालयातील योगेश इंगळे यांच्या पथकाद्वारे करण्यात आली.