शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी तिसरी अटक, फूड स्टॉल मालक ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 04:07 PM2022-05-20T16:07:16+5:302022-05-20T17:05:38+5:30
Sharad Pawar Case : इनामदार याच्याविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, त्याचा शोध लागला नव्हता.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांच्याविरोधात सोशल मीडियावर (Social Media) आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी महाराष्ट्रातील पनवेल शहर पोलिसांनी बुधवारी रात्री एका ३४ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. पवारांविरोधात सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ही तिसरी अटक आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव किरण इनामदार (kiran Inamdar) असून तो पनवेलमध्ये फूड स्टॉल चालवतो. त्याला गुरुवारी पनवेल न्यायालयात हजर केले असता, तेथून त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या सुरुवातीला मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुकवर पवारांबद्दल कथित आक्षेपार्ह पोस्ट केली होती. ती पोस्ट इनामदार याने सोशल मीडियावर शेअर केली होती. इनामदार याच्याविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, त्याचा शोध लागला नव्हता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इनामदार हा अलिबागमध्ये लपला होता, तेथून पोलिसांनी त्याला बुधवारी रात्री ताब्यात घेऊन पनवेलला आणले. इनामदार यास पनवेल शहर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याला घेराव केला आणि पक्षाच्या महिला सदस्यांनी तेथे धरणे सुरू केले. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कडबाने यांनी सांगितले की, आरोपी इनामदार याच्यावर भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम १५३ अ (धर्म, जात, जन्मस्थान, निवासस्थान या कारणावरून विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे), ५०० (बदनामी), ५०१ (अपमानास्पद सामग्री पोस्ट करणे) आणि ५०४ (जाणूनबुजून अपमान) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. तो शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहे. आधी केतकी चितळे, निखिल भामरे आणि आता किरण इनामदार याला पोलिसांनी अटक केली आहे.