पोलिसाच्या पाठीवर लाथ; 'त्या' फोटोमागची खरी कहाणी अखेर उलगडली!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2018 01:14 PM2018-07-28T13:14:35+5:302018-07-28T13:15:35+5:30
हिंगोली ग्रामीणच्या डिवायएसपी सुजाता पाटील यांनी या फोटोचा खुलासा देत खरी कहाणी केली उघड
मुंबई - मराठा आंदोलनादरम्यान २४ जुलैला कर्तव्यावर असलेल्या एका पोलीसाच्या पाठीवर लाथ मारलेला फोटो व्हायरल झाला होता. आणि त्या व्हायरल फोटो खरा कि खोटा यावर चर्चा रंगली होती. अनेकांनी हा फोटो खोटा असल्याचा दावा केला होता. मात्र, हिंगोलीच्या डिवायएसपी सुजाता पाटील यांनी हा दावा खोडून काढत व्हायरल झालेला फोटो खरा असल्याचा पुरावा फेसबुकवर दिला आहे. हिंगोलीतील पोलीस कॉन्स्टेबल सतीश मोडक हे व्हायरल झालेल्या फोटोत पाठमोरे उभे असल्याची खळबळजनक माहिती पाटील यांनी उघड केली आहे.
२५ जुलै रोजी मुंबई बंददरम्यान पोलिसाच्या पाठीवर लाथ मारलेला आणि युनिफॉर्मवर बुटाचा ठसा उमटलेला एक फोटो व्हायरल झाला होता. मात्र, काही वेळाने तो फोटो खोटा असल्याचा दावा केला होता आणि त्यात मराठा आंदोलनाचा काहीही संबंध नाही असे स्पष्ट करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी हिंगोली ग्रामीणच्या डिवायएसपी सुजाता पाटील यांनी या फोटोचा खुलासा देत खरी कहाणी त्यांनी उघड केली. सुजाता पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले की, हिंगोली हेडक्वार्टरमध्ये कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल सतीश मोडक हे बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - नांदेड रोडवरील डोंगरकडा नावाने ओळखल्या जाणाऱ्या परिरसरत मोडक बंदोबस्तासाठी तैनात होते. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक तेरले यांच्याभोवती सरंक्षण कडं तयार केलेल्या मोडक यांच्या पाठीमागे अज्ञात आंदोलकाने लाथ मारली होती. याप्रकरणी मोडक यांच्याकडे आम्ही चौकशी केली असता त्यांनी सुद्धा बंदोबस्तावर असताना कोणीतरी मागून लाथ मारली होती. नंतर एका मित्राने बुटाचा ठसा मागे युनिफॉर्म असल्याचे मला सांगून त्याने फोटो काढून व्हायरल केला असल्याची माहिती पाटील यांनी पुढे दिली. २४ जुलैला हिंगोलीत मराठा आंदोलनाच्या वेळी खूप जाळपोळ, टायर फोडणे असे हिंसक प्रकार सुरु होते. त्याकरिता बंदोबस्तावर मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यावेळी हि घटना घडली. याप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेणं सुरु असल्याचं पाटील यांनी सांगितले.
सतीश मोडक हे हिंगोलीचे रहिवाशी असून ते तेथूनच पोलीस भरती झाले. गेली १० ते १२ वर्ष ते पोलीस सेवेत कार्यरत आहेत. याप्रकरणाचा तपास सहाय्य्क पोलीस निरीक्षक चिंचोलकर करत आहेत.