पाच वर्षांपासून 'तो' चालवत होता बनावट न्यायालय; स्वत:च झाला न्यायाधीश, वकीलही होते खोटे!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 02:33 PM2024-10-23T14:33:41+5:302024-10-23T14:34:26+5:30

गुजरातमधून फसवणुकीचा आणखी एक प्रकार समोर

For five years 'he' had been running a fake court; He himself became a judge, the lawyer was also a lie! | पाच वर्षांपासून 'तो' चालवत होता बनावट न्यायालय; स्वत:च झाला न्यायाधीश, वकीलही होते खोटे!

पाच वर्षांपासून 'तो' चालवत होता बनावट न्यायालय; स्वत:च झाला न्यायाधीश, वकीलही होते खोटे!

अहमदाबाद: गुजरातमध्ये आणखी एक फसवणुकीचा प्रकार समोर आला असून, तो अतिशय धक्कादायक आहे. येथे एका व्यक्तीने बनावट कोर्ट तयार केले. स्वत:ला बनावट कोर्टाचे न्यायाधीश म्हणून घोषित करून अनेक निकाल दिले. आरोपी हा प्रकार पाच वर्षांपासून करत होता. या पाच वर्षांत त्याने कोट्यवधी रुपयांची सुमारे १०० एकर सरकारी जमीन आपल्या नावावर करण्याचे आदेशही दिले होते.

मॉरिस सॅम्युअल असे या बनावट आरोपीचे नाव असून, त्याने आपल्या गांधीनगरमधील कार्यालयात कोर्टात जसे वातावरण होते तसे निर्माण केले होते. बनावट न्यायाधीश बनून लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी अहमदाबाद पोलिसांनी मॉरिसला अटक केली आहे.

साथीदार व्हायचे वकील

मॉरिस खटल्यातील युक्तिवाद ऐकत असे व न्यायाधिकरणाचे अधिकारी म्हणून आदेश देत असे. इतकेच नव्हे तर, त्याचे साथीदार न्यायालयीन कर्मचारी किंवा वकील असल्याचे भासवून कारवाई खरी असल्याचे भासवत असत. या युक्तीने मॉरिसने ११हून अधिक प्रकरणांमध्ये त्याच्या बाजूने आदेश पारित केले होते.

कार्यालय अगदी कोर्टासारखे....

मॉरिस अशा लोकांना अडकवायचा ज्यांच्या जमिनीच्या वादाची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. तो त्याच्या ग्राहकांकडून केस सोडवण्यासाठी फी म्हणून विशिष्ट रक्कम घेत असे. मॉरिस स्वत:ला कोर्टाचा न्यायाधीश म्हणवून घेत असे. तो आपल्या क्लायंटला गांधीनगर येथील कार्यालयात बोलवायचा. हे कार्यालय अगदी कोर्टासारखे तयार करण्यात आले होते.

काय केले?

आरोपीने २०१९मध्ये सरकारी जमिनीशी संबंधित एका प्रकरणात सरकारच्या विरोधात निर्णय देत जमीन आपल्या ताब्यात घेतली होती. त्यामुळे तो सापडला आहे.

महाठग किरण पटेलचे प्रकरण

  • यापूर्वी गुजरातमध्ये २०२३मध्ये स्वत:ला पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी असे सांगणाऱ्या किरण पटेलचे प्रकरणही चर्चेत होते.
  • अहमदाबाद पोलिसांनी २२ मार्च रोजी किरण पटेल आणि त्याची पत्नी मालिनी यांच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
  • या दोघांनी मंत्र्यांचा बंगला नूतनीकरणाच्या नावाखाली घेतला आणि नंतर बनावट कागदपत्रे दाखवून त्याचा ताबा घेतला.
     

...असा पकडला भामटा

  • सन २०१९ मध्ये, आरोपीने त्याच्या क्लायंटच्या बाजूने असाच आदेश दिला होता.
  • या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मॉरिसने अन्य वकिलामार्फत दिवाणी न्यायालयात अपील केले. 
  • त्याने जो आदेश काढला होता, तोच आदेश सोबत जोडला होता. मात्र, कोर्टाचे रजिस्ट्रार हार्दिक देसाई यांना मॉरिस हा न्यायाधीश नसल्याचे आढळले आणि त्यांनी कारंज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
  • यानंतर फसवणूक करणाऱ्यावर कारवाई करून त्याच्या खोट्या कोर्टाचा पर्दाफाश झाला.

Web Title: For five years 'he' had been running a fake court; He himself became a judge, the lawyer was also a lie!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.