पत्नीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवणं ठरणार बलात्कार? सुप्रीम कोर्ट घेणार कायद्याचा आढावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 06:18 PM2022-05-10T18:18:36+5:302022-05-10T18:19:06+5:30
Marital Rape Case : याला गुन्ह्याच्या कक्षेत आणण्याची मागणी अनेक महिला संघटना वर्षानुवर्षे करत आहेत. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे.
नवी दिल्ली : पत्नी आपल्या पतीवर बलात्काराचा दावा करू शकते का याचा आढावा सर्वोच्च न्यायालय घेणार आहे. म्हणजेच पतीला पत्नीवर जबरदस्ती करण्याचा अधिकार आहे का? सध्याच्या कायद्यानुसार पत्नी आपल्या पतीवर बलात्काराचा दावा करू शकत नाही. पुरुषाला आपल्या पत्नीशी मनाप्रमाणे संबंध ठेवण्याचा अधिकार आहे. वैवाहिक बलात्कार म्हणजेच वैवाहिक जीवनात जबरदस्तीने संबंध ठेवणे हा गुन्हा मानला जात नाही. याला गुन्ह्याच्या कक्षेत आणण्याची मागणी अनेक महिला संघटना वर्षानुवर्षे करत आहेत. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कर्नाटकातील एका प्रकरणात नोटीस बजावली आणि राज्य सरकारकडून उत्तर मागवले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी ३ जुलै रोजी होणार आहे. खरं तर, कर्नाटकातील एका विवाहित पुरुषावर त्याच्या पत्नीने बलात्काराचा आरोप केला होता, ज्यावर ट्रायल कोर्टाने आरोपीविरुद्ध आयपीसीच्या कलम ३७६ (बलात्कार) अंतर्गत एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले होते. कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आरोपीने कर्नाटक उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने आरोपीला त्याच्यावर दाखल झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्याला सामोरे जाण्याचे निर्देशही दिले होते.
२९ मे पासून कनिष्ठ न्यायालयात खटल्याची कार्यवाही सुरू होणार आहे. या विरोधात पतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कायद्यानुसार त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे पतीने आपल्या याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे कनिष्ठ न्यायालयाच्या कारवाईला स्थगिती द्यावी. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कनिष्ठ न्यायालयाच्या कारवाईला स्थगिती दिली नाही, परंतु याचिकाकर्त्याला या प्रकरणावर आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याची माहिती कनिष्ठ न्यायालयाला देण्यास सांगितले. सर्वोच्च न्यायालय आता या कायद्याचा आढावा घेणार आहे.