देवधरी घाटात जबरी चोरीचा डाव उधळला; पोलिसांकडून २ आरोपींना बेड्या
By विशाल सोनटक्के | Published: May 9, 2023 02:43 PM2023-05-09T14:43:59+5:302023-05-09T14:44:58+5:30
पोलिस पथकाने दोन आरोपींना केली अटक : काठीचा धाक अन् दगड मारुन वाहने लुटण्याचा होता प्रयत्न
यवतमाळ : वडकी-पांढरकवडा परिसरातील देवधरी घाटात रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांना दगड मारुन तसेच काठीचा धाक दाखवून चौघेजण जबरी चोरीचा प्रयत्न करीत होते. पोलिस पथक घटनास्थळी पोहोचताच चारही आरोपींनी चारचाकीतून पळ काढला. या चौघांचीही ओळख पटली असून दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर पसार झालेल्या दोघांचा पोलिस पथक शोध घेत आहे.
वडकी पोलिस स्टेशनच्या वतीने देवधरी घाटात रात्री पेट्रोलिंग करण्यात येते. सोमवारी रात्री १२ च्या सुमारास काही इसम घाटात थांबून ट्रक व वाहनावर दगड मारीत असल्याचे तसेच काठीच्या धाकाने वाहने थांबवून चोरीचा प्रयत्न करीत असल्याची माहिती या पथकाला मिळाली. पथकाने तातडीने घटनास्थळ गाठले असता तेथे चौघेजण चोरीच्या इराद्याने हातात काठ्या-दगड घेवून थांबल्याचे दिसले. पोलिसांची गाडी जवळ पोहोचताच हे चौघेही एका कारमधून पसार झाले. मात्र चौघांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. या आरोपींचा पोलिसांनी कसून शोध घेत त्यातील दोघांना वाहनासह ताब्यात घेतले.
या प्रकरणी कुणाल भास्कर केराम, समीर अरुण येरेकर दोघे रा. वडकी आणि युवराज वसंत चटकी रा. दहेगाव, शंकर उर्फ शेषकुमार गजानन झिले रा. येरला या चौघांवर भादंवि कलम ३९३, ३४१, २७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात वडकी पोलिस ठाण्याचे विजय महाले, रमेश मेश्राम, विजय बसेशंकर, विकेश द्यावर्तीवार, आकाश कुदुसे, किरण दासारवार, अरविंद चव्हाण आदींनी केली.