विद्यार्थिनीला जबरदस्तीने कारमध्ये खेचून अश्लिल चाळे; युवासेनेच्या कार्यकर्त्याला चोपले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 12:44 PM2019-12-25T12:44:44+5:302019-12-25T14:30:08+5:30
या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून अवधुतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
यवतमाळ : युवा सेनेचा कार्यकर्ता असल्याचे सांगणाºया युवकाला विद्यार्थिनीची छेडखानी केल्याप्रकरणी महिलांनी मंगळवारी दुपारी यवतमाळच्या बसस्थानक परिसरात चारचाकी वाहनातून ओढून चोप दिला. यावेळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. या युवकाला अवधूतवाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
सुमित सुरेश खांदवे रा. उत्तरवाढोणा, ता. नेर जि. यवतमाळ असे या युवकाचे नाव आहे. त्याच्यावर विनयभंग आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दुपारी त्याला पोलीस कोठडी मिळविण्यासाठी न्यायालयात उपस्थित केले जाणार आहे. सुमितच्या गावातील मुलगी यवतमाळात शिक्षणासाठी ये-जा करीत होती. त्याचा फायदा उठवित त्याने तिची अनेक दिवसांपासून छेडखानी चालविली होती. अखेर याला कंटाळून या विद्यार्थिनीने धाडस दाखवित नारीरक्षा समितीकडे तक्रार करून आपबिती कथन केली.
मंगळवारी सुमित नेहमीप्रमाणे या मुलीचा पाठलाग करीत छेडखानी करण्यासाठी यवतमाळच्या बसस्थानक परिसरात आला असता नारीरक्षा समितीच्या महिला सदस्यांनी व अन्य युवकांनी त्याला चारचाकी वाहनातून ओढून बाहेर काढले व सर्वांसमक्ष चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला अवधूतवाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. तेथे महिला पोलीस अधिकारी उपलब्ध नसल्याने गुन्हा दाखल होण्यासाठी त्यांना बरीच प्रतीक्षा करावी लागली.
सदर युवक हा युवा सेनेच्या कुठल्याच पदावर कार्यरत नव्हता. फक्त कार्यकर्ता म्हणून तो वावरत होता. प्रत्यक्ष त्याचा पक्षाशी असा कुठलाही संबंध आला नाही. या प्रकरणात चौकशी करून पोलिसांनी सत्य उघड करावे, तथ्य असल्यास दोषीला सोडू नये.
- पराग पिंगळे
जिल्हा प्रमुख, शिवसेना