३० लाख रुपये किमतीचे मांडूळ जप्त; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 12:27 PM2021-09-11T12:27:41+5:302021-09-11T12:27:57+5:30
हिंगोलीच्या एटीएस पथकाची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ ( जि. हिंगोली) : तालुक्यातील येळीफाटा येथे शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली दहशतवाद विरोधी पथकाने महांडूळ तस्करावर कारवाई केली. यावेळी चार फूट लांबीचे ३० लाख रुपये किमतीचे मांडूळ जप्त करून एका तस्करास ताब्यात घेतले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या सापाची एक कोटीवर किंमत असल्याचे सांगण्यात आले.
औंढा पोलीस ठाणे हद्दीतील येळीफाटा येथे मांडूळाची तस्करी होत असल्याच्या प्राथमिक माहितीच्या आधारे संयुक्त कारवाई करून मांडूळ विक्री करणाऱ्या गौतम विकास सपाटे (रा. कौडगाव) यास ताब्यात घेतले. यावेळी आरोपीवर कारवाई करीत पकडलेले महांडूळ वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. ३ किलो ६०० ग्रॅम वजनाचे हे मांडूळ होते.
ग्राहक म्हणून व्यवहार
एटीएसच्या पथकाने तस्करासोबत ग्राहक म्हणून सौदा केला. हो-नाही करीत तस्कराने तीस लाख रुपये किंमत सांगितली. पथकाने मांडूळ दाखविण्यास सांगितले. तस्कराने मांडूळ दाखविताच कारवाई करीत महांडूळ ताब्यात घेतले.