जेएनपीटीत पुन्हा निघाला विदेशी सिगारेटचा धूर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 06:27 AM2021-03-02T06:27:03+5:302021-03-02T06:27:13+5:30
तब्बल पावणेपाच कोटी किमतीचा विदेशी साठा जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
उरण : केवायसी कागदपत्रांचा गैरवापर करून मिळणारा आयात-निर्यातदार कोड (आयईसी) वापरून दुबईहून मुंबईत पाठविण्यासाठी आलेला पावणेपाच कोटी किंमतीचा विदेशी सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला आहे. डीआरआय मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांनी न्हावा-शेवा बंदर परिसरातील एका सीएफएसमधील कंटेनरमधून २१ कोटी ६० लाख सिगारेट हस्तगत केल्या आहेत. त्यांची किंमत पावणे पाच कोटी रुपये इतकी आहे. लेदर वॉयलेटच्या नावाखाली तस्करी मार्गाने दुबईतून मुंबईच्या एका व्यापाऱ्याकडे पाठविण्यात आला होता.
खबऱ्याकडून गुप्त माहिती मिळाल्यानंतर डीआरआयच्या मुंबई युनिटने न्हावा-शेवा बंदर परिसरातील सीएफएसमधील एका संशयित कंटेनरची तपासणी केली. तपासणीत लेदर वॉयलेटच्या साठ्यात २१ कोटी ६० लाख सिगारेट लपवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. तस्करी मार्गाने आणण्यात आलेल्या पावणेपाच कोटी किमतीच्या सिगारेट आयात प्रकरणी अद्यापही कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
तपासात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने अधिक माहिती देता येणार नाही.
मात्र यासाठी तपास सुरू असल्याची माहिती डीआरआय सूत्रांनी दिली.लेदर वॉयलेटच्या नावाखाली तस्करी मार्गाने दुबईतून मुंबईच्या एका व्यापाऱ्याकडे पाठविण्यात आला होता.
यापूर्वीही सापडला होता साठा
जेएनपीटी परिसरात यापूर्वी देखील डीआरआयच्या पथकाने केलेल्या कारवाईत फेब्रुवारी २०२० मध्ये दुबईहून जेएनपीटीमार्गे पाठविण्यात आलेल्या १४ कोटी रुपयांच्या तर जून २०२० मध्ये ११ कोटी ८८ लाख रुपयांच्या विदेशी सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला होता.