विदेशी नागरिकांची फसवणूक करणारे विदेशी नागरिक अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 05:04 AM2019-02-03T05:04:48+5:302019-02-03T05:05:16+5:30
क्राइम ब्रांचचे अधिकारी असल्याचे सांगून विदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. जोहरी अकबर (३०) आणि हमीद अली फिरोज (२१) असे या इराणी नागरिक आरोपींची नावे आहेत.
मुंबई - क्राइम ब्रांचचे अधिकारी असल्याचे सांगून विदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. जोहरी अकबर (३०) आणि हमीद अली फिरोज (२१) असे या इराणी नागरिक आरोपींची नावे आहेत़ फसवणुकीतून वसूल केलेली रक्कम त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आली आहे. विक्रोळी पोलिसांनी ही कारवाई केली.
अली इंद्रिस नासिर (५३) हे यमनचे नागरिक असून ते तेथील एक आर्मी अधिकारी आहेत. ते नेहमी आपल्या पत्नीसोबत मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात उपचारासाठी येतात. दोन ते तीन महिन्यांनी ते औषधोपचार करून यमनला परत जात असत. त्यासाठी त्यांनी महंमद अली रोड येथे भाड्याने घर घेतले आहे. नेहमीप्रमाणे ते दोघेही १९ जानेवारीला फोर्टिस रुग्णालयातून तपासणी करून साधारणत: दुपारी दीडच्या सुमारास घरी टॅक्सीने परतत होते. ऐरोली ब्रिजखालून पूर्व द्रुतगती मार्गावरील भांडुप पम्पिंग बस स्टॉपजवळ आल्यानंतर एका काळ्या रंगाच्या कारमधून दोन अज्ञात इसमांनी टॅक्सी चालकाला टॅक्सी बाजूला थांबविण्यासाठी सांगितले. त्यानुसार टॅक्सी थांबविल्यानंतर कारमधून दोन इसम उतरले. त्यामधील एका इसमाने क्राइम ब्रांचचे ओळखपत्र दाखविले. आम्ही क्राइम ब्रांचचे अधिकारी असून, तुमच्याकडे अमली पदार्थ असल्याचे सांगून त्यांची झडती घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या बॅगेतून चार हजार अमेरिकन डॉलर (अंदाजे किंमत २ लाख ८४ हजार रुपये) काढून घेऊन तेथून पोबारा केला.
या प्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अली यांनी विक्रोळी पोलीस ठाणे गाठून घडलेला सर्व प्रकार सांगत तक्रार दाखल केली. त्यानुसार विक्रोळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन पथके नेमली. सीसीटीव्ही फूटेज आणि माहितीच्या आधारे आरोपी अंधेरी येथील हॉटेलमध्ये दडून बसल्याचे कळले.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या दोन्ही इराणी नागरिकांना हॉटेलमधून अटक केली. त्यांच्याकडून पासपोर्ट आणि ६४ हजार ३३४ रुपयांची भारतीय तसेच अमेरिकन आणि विदेशी चलनाची रक्कम हस्तगत करण्यात आली.