महिलेने पोटात लपविले ५ कोटींचे कोकेन, मुंबई विमानतळावर परदेशी महिलेला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 06:45 AM2019-08-15T06:45:09+5:302019-08-15T06:45:35+5:30
व्हेनेझुएलाची नागरिक असलेल्या एका महिलेने आपल्या पोटात ८०० ग्रॅम कोकेन लपवून आणल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मुंबई : व्हेनेझुएलाची नागरिक असलेल्या एका महिलेने आपल्या पोटात ८०० ग्रॅम कोकेन लपवून आणल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महसूल गुप्तचर महासंचालनालय (डीआरआय)ने तिला मुंबई विमानतळावरून अटक केली असून, या कोकेनची किंमत तब्बल पाच कोटी आहे. महसूल गुप्तचर महासंचालनालयाचे सहआयुक्त समीर वानखेडे यांनी या माहितीला दुजोरा दिला.
बाल्झाबाप्तिसा करेंद्रालेन्नी (२७) असे या महिलेचे नाव आहे. ती इथिओपियन एअरलाइन्सच्या विमानाने सौ पाऊलो (ब्राझिल) येथून आदिस अबाबामार्गे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाली होती. तिने कॅप्सूलमध्ये लपवून कोकेन गिळले होते.
न्यायालयाने सीमाशुल्क कायदा १९६२च्या कलम १०३ अन्वये तिच्या आवश्यक त्या चाचण्या करण्यास परवानगी दिली. जे. जे. रुग्णालयात तिच्या चाचण्या करण्यात आल्या. तिने कॅप्सूल गिळल्याचे पोटाच्या एक्सरे तपासणीमध्ये स्पष्ट झाले. डॉक्टरांनी याबाबत माहिती दिल्यानंतर, आरोपीने कॅप्सूल गिळल्याची कबुली दिली. आरोपी महिलेला केवळ स्पॅनिश भाषा बोलता येत असल्याने गौतम पांडे या स्पॅनिश भाषा जाणकाराच्या मदतीने तिच्याशी संवाद साधून तिचा जबाब नोंदविण्यात आला.
वैद्यकीय चाचणीनंतर तिच्या पोटातून कॅप्सूल बाहेर काढण्यात यश आले. कॅप्सूलची तपासणी केल्यानंतर त्यात कोकेन लपवून आणल्याचे सिद्ध झाले. दरम्यान, तिच्याकडून ७९६ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. त्याची किंमत ४ कोटी ७७ लाख इतकी आहे. न्यायालयाने तिला २८ आॅगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे.
आरोपी महिलेची पार्श्वभूमी
आरोपी महिला सुरुवातीला टेलिकॉलर म्हणून कार्यरत होती. नंतर काही काळ ती वेश्या व्यवसायात होती. त्यानंतर, तिने दोन वर्षे लष्करात काम केले. तिच्या मित्राने तिला या कामाबाबत माहिती दिली. तिचा नायझेरियन मित्र जगातील अनेक देशांमध्ये अमली पदार्थ पाठवत असल्याची माहिती तिने दिली. १०० कॅप्सूल मुंबईत नेण्यासाठी तिला ५ हजार अमेरिकन डॉलर्स देण्यात येणार होते. मात्र, तिला केवळ ८० कॅप्सूल गिळता आले. केवळ पैशांच्या हव्यासापोटी हा गुन्हा केल्याची कबुली तिने दिली आहे.