मृत चिमुकलीचा व्हिसेरा पोलीस पाठविणार फॉरेन्सिक लॅबला
By पूनम अपराज | Published: March 13, 2019 09:47 PM2019-03-13T21:47:15+5:302019-03-13T21:49:51+5:30
सध्या काळाचौकी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.
मुंबई - चिंचपोकळी रेल्वे स्थानकानजीक असलेल्या प्रोग्रेसिव्ह इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आरोही आई वडील, काका आणि १० वर्षाच्या बहिणीसोबत राहते. काल दुपारी २ च्या सुमारास घराबाहेर खेळत असताना अचानक ती गायब झाली. आरोही गायब झाल्याचे लक्षात येताच कुटुंबियांनी तिचा शोध सुरु केला. तासाभराने कुटुंबियांनी काळाचौकी पोलीस ठाणे गाठून मिसिंग तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, काळाचौकी पोलीस ठाण्याचे २० ते २५ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी इमारतीतील प्रत्येक घरांचा शोध घेतला. मात्र, मुलीचा काहीच थांगपत्ता लागला नाही. अखेर, सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील बाल्कनीच्या शेडवर ती जखमी अवस्थेत मिळून आली. तिला तात्काळ जवळच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिला मृत घोषित केले आणि शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात तिच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झालं असून पोलिसांनी व्हिसेरा काढला आहे. हा व्हिसेरा पुढील तपासासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. सध्या काळाचौकी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.
पालकांनो काळजी घ्या! चिंचपोकळीत रेल्वेच्या आवाजाच्या उत्सुकतेमुळे चिमुरडीने गमावला जीव