लग्नाचा बनाव; वारंवार लैंगिक शोषण अन् आता झाला ‘नॉट रिचेबल’!
By प्रदीप भाकरे | Published: May 21, 2023 03:32 PM2023-05-21T15:32:59+5:302023-05-21T15:33:51+5:30
तरूणीचे लैंगिक शोषण : प्रियकराच्या पालकांनीही घरातून हाकलले, गुन्हा दाखल
प्रदीप भाकरे
अमरावती: गरिब श्रीमंत असा भेदभाव मानत नाही, असे म्हणत प्रेमजाळ्यात ओढणाऱ्या प्रियकराने लग्नास नकार देऊन एका तरूणीचे वारंवार लैंगिक शोषण केले. फ्रेबुवारी २०२२ ते मे २०२३ दरम्यान ती अत्याचाराची मालिका घडली. याप्रकरणी पिडित तरूणीच्या तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी आरोपी पुर्वल थोटेे (रा. अंबिकानगर, अमरावती) याच्याविरूध्द २० मे रोजी रात्री बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, येथे भाड्याने खोली करून घरकाम करणाऱ्या एका तरूणीची डिसेंबर २०२१ मध्ये आरोपी पुर्वल थोटे याच्याशी ओळख झाली. ते दोघे फोनवरून बोलू लागले. त्यातून त्यांचे प्रेमसंबंध जुळले. मी केवळ दहावी शिकली असून, घरची परिस्थिती सुध्दा कमकुवत आहे. तू चांगला सुशिक्षित व श्रीमंत घरातील वाटतो, मग आपले कसे जमणार, असा प्रश्न तिने काही दिवसांनी पुर्वलकडे केला. त्यावर आपण श्रीमंतीला व शिक्षणाला महत्व देत नाही, असे बोलून त्याने तिच्याशी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. त्यानंतर फेब्रुवारी २०२२ मधे कुठेतरी फिरायला जावु, व्हॅलेंटाईन डे साजरा करु, असे म्हणून पुर्वल ११ फेब्रुवारी २०२२ रोजी आपल्याला शेगावला घेऊन गेल्याचे तरूणीने म्हटले आहे.
शेगावी केले गेस्ट हाऊस
शेगाव येथील एका गेस्ट हाऊसमध्ये आराम करत असताना पुर्वलने तिच्याशी जवळीक केली. त्यास ठाम नकार दिला असता त्याने आपण लग्न करणारच आहोत, असे बोलून आताही आपण लग्न न करता एकत्र आलो आहोत. तु बाहेर गेली किंवा आरडा ओरड केली तर तुझी बदनामी होईल, पोलीस आपल्या दोघांना पकडतील, अशी बतावणी केली. त्या घाबरलेल्या स्थितीतच पुर्वलने तिचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर ती रात्रभर रडली. त्यावर आपण उदयाच लग्न करू, अशी गळ तिने घातली.
असा केला लग्नाचा बनाव
१२ फेब्रुवारी रोजी सकाळी पुर्वल मंगळसूत्र, हार व सिंदुर व एक भटजी घेऊन शेगावातील एका ठिकाणी परत आला. तेथेच भटजीने त्यांचे लग्न लावुन दिले. त्यादिवशी दोघेही अमरावतीला परतले. त्यानंतर पुर्वल तिला तिच्या भाडयाच्या खोलीवर भेटायला यायचा. तेथे राहून त्याने अनेकदा तिचे शोषण केले. यंदाच्या फेब्रुवारीमध्ये तो तिला भेटायला आला. आपले आई वडील खुप ओरडले असून, ते त्याला स्विकारण्यास तयार नसल्याचे सांगून तो निघून गेला.
म्हणून झाली ती दु:खी
फेब्रुवारीनंतर पुर्वलने पिडिताशी बोलणे कमी केले. तो कॉल देखील टाळू लागला. दरम्यान, पुर्वलचे आई वडील त्याचे लग्न करणार असल्याची माहिती पिडिताला मिळाली. त्यामुळे ती त्याच्या घरी पोहोचली. त्याच्या पालकांना त्यांच्या संबंधांबाबत माहिती दिली. मात्र त्यांनी काहीच ऐकून न घेता आपल्याला घरातून हाकलून दिले. त्यामुळे तिने २० रोजी रात्री पोलीस ठाणे गाठले.