‘राष्ट्रवादी’ शहराध्यक्षाच्या खुनाचा कट : भिवंडीच्या माजी उपमहापौरांस हत्या प्रकरणात अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 01:36 AM2019-08-16T01:36:48+5:302019-08-16T01:36:52+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष खालिद गुड्डू यांच्या हत्येच्या कटात कथित सहभाग असलेले काँग्रेसचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक अहमद हुसेन मंगरू हुसेन सिद्दीकी यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्याने शहर पोलिसांनी त्यांना बुधवारी राहत्या घरातून अटक केली.
भिवंडी : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष खालिद गुड्डू यांच्या हत्येच्या कटात कथित सहभाग असलेले काँग्रेसचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक अहमद हुसेन मंगरू हुसेन सिद्दीकी यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्याने शहर पोलिसांनी त्यांना बुधवारी राहत्या घरातून अटक केली. सिद्दीकी यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे शहरातील काँग्रेस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शहरातील समदनगर भागात २० जूनच्या रात्री दोन संशयित फिरत असल्याची खबर नागरिकांनी शहर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी मो. साजीद निसार अन्सारी व मो. दानिश मो. फारूक अन्सारी या दोन शार्पशूटर्सना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे अमेरिकन बनावटीची दोन महागडी पिस्तुले व १५ जिवंत काडतुसे सापडली होती. पोलिसांनी त्यांची कसून तपासणी केली असता २८ जून २०१८ रोजी मो. अलीम निजामुद्दीन सिद्दीकी ऊर्फ अलीम बक्कन सरदार याने समदनगर येथील राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष खालिद गुड्डू यांना मारण्यासाठी दोन लाख रु पयांची सुपारी दिल्याचे कबूल केले. पोलिसांनी अलीम बक्कन सरदार यास व माजी महापौर अहमद हुसेन यांचा भाऊ मो. अश्फाक मंगरू सिद्दीकी या दोघांना अटक केली होती. पुढील तपासात या कटात काँग्रेसचे माजी उपमहापौर तथा नगरसेवक अहमद सिद्दीकी हेही सहभागी असल्याचे उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, त्यांनी अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला होता. मात्र, त्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. अहमद सिद्दीकी हे तेव्हापासून फरार होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे खालिद गुड्डू यांनी भिवंडीतील पोलीस आरोपीला अटक करण्यात हयगय करत असल्याचा आरोप करत ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे तक्र ार केली होती.
अखेर, शहर पोलिसांनी बुधवारी सकाळी अहमद सिद्दीकी यास अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने हत्येच्या कटातील गांभीर्य लक्षात घेऊन २० आॅगस्टपर्यंत सिद्दीकी यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
कार्यकर्त्यांची गर्दी
यावेळी न्यायालयात काँग्रेसचे नगरसेवक व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याने वातावरण तंग झाले होते. मात्र, पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. या गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे करत आहेत.